अल्प कर्जमाफीच्या विरोधात लाक्षणिक उपोषण

भाजप-शिवसेना सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेळीच्या शेपटाएवढीच आहे.

कृषी कर्जमाफी अल्प प्रमाणात असल्याने निषेधार्थ येवला तालुक्यातील सायगाव येथे सोमवारी शेतकरी नेते प्रा. शिवाजी भालेराव यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले (छाया-संतोष बटाव)

भाजप-शिवसेना सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेळीच्या शेपटाएवढीच आहे. या कर्जमाफीने धड शेतकऱ्यांना स्वत:ची लाजही झाकता येईना आणि माशाही हाकलता येईना अशी अवस्था झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत येवला तालुक्यातील सायगावमधील शेकडो शेतकऱ्यांनी शेतकरी नेते प्रा. शिवाजी भालेराव यांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफीच्या निषेधार्थ सोमवारी लाक्षणिक उपोषण केले

प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर शासनाने ३० जून २०१६ पर्यंत कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांचे दिड लाखापर्यंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली. परंतु, या कर्जमाफी निकषात केवळ आठ ते १० टक्केच शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या ९० टक्के शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवले जाणार आहे. ही चेष्टा असल्याचे मत सायगावच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्विकारण्यात आला. सरकारने ३० जून २०१७ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना दिड लाखाची कर्जमाफी दिली असती तर सर्वाना लाभ मिळाला असता. परंतु, ३० जून २०१६ पूर्वीचे व नंतरचे असा भेदभाव करून सरकारने निराशा केली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांचे संभाव्य सातबारा कोरा करण्यासाठीचे आंदोलन दडपण्यासाठी भाजप सरकारने शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांशी संगनमत करून या फसव्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. एका बाजुला सरसकट कर्जमाफीचा शब्दप्रयोग करायचा आणि दुसऱ्या बाजुने विविध निकषांचा फास शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती आवळायचा अशी सरकारची नीती आहे. या सर्व पापाचे वाटेकरी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षदेखील असल्याचा आरोप प्रा. भालेराव यांनी केला आहे. उपोषणस्थळी लावण्यात आलेल्या फलकावर ३० जून २०१७ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, मध्यम मुदत कर्जदारांना माफीचा लाभ मिळावा, तृतीय आणि चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या शेतकरी कुटुंबांचा कर्जमाफीत समावेश करावा, सरसकट कर्जमाफीत निकषांचे कोणतेही बंधन ठेवू नये, विहीर, घर, गाय, गोठा, जलवाहिनी आदींसाठी घेतलेले कर्ज माफ करावे आदी मागण्यांचा उल्लेख आहे. उपोषणास बसलेल्यांमध्ये येवला तालुका खरेदी विक्री संघ संचालक भागुनाथ उशीर, सरपंच योगिता भालेराव, उपसरपंच गोरख भालेराव, माजी सरपंच सुनील देशमुख आदी सव्वाशे शेतकरी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hunger strike for low debt waiver at nashik