ओझर पोलीस ठाण्यात पत्नी, सासऱ्यासह चार जणांवर गुन्हा दाखल

पत्नी व सासरच्या जाचाला कंटाळून हिंदूस्तान एरोनॉटीक्स लिमिटेडमधील कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ओझर येथे घडली. पुण्यात निर्माता अतुल तापकीर याच्या पाठोपाठ पत्नी व सासरच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची ही दुसरी घटना आहे. या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात पत्नी, सासऱ्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष मच्छिंद्र पवार (३२) असे या पतीचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली. या प्रकरणी संतोषचा भाऊ सचिन पवार यांनी तक्रार दिली. ओझर टाऊनशीप येथील घरात संतोषने आत्महत्या केली. हा निर्णय घेण्याआधी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचाबद्दल त्याने पोलिसांकडे दाद मागितली होती. परंतु, त्यांनी काही कारवाई केली नसल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. कायदे मुलींच्या बाजुने आहेत, पण त्याचा उपयोग दुसऱ्यांचे आयुष्य बरबाद करण्यास नाही. सासरची मंडळी पत्नी प्रियाला वेगवेगळ्या कारणावरून माहेरी बोलावून घेत असे. तसेच संतोषला ओझर येथे येऊन मारहाण व दमदाटी केली जायची. सासरच्या मंडळींनी जिवे मारण्याची धमकी दिली. सततत्या मानसिक व शारीरिक छळास कंटाळून भावाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी  कृष्णाजी शिंदे (रा. गाजरवाडी, निफाड), विष्णू शिंदे (मुलूंड, मुंबई), आप्पासाहेब बोरगुडे (नैताळे) आणि पत्नी प्रिया पवार (रा. मुंबई) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपली फसवणूक करून लग्न लावण्यात आले. नंतर आपल्यामागे कोणी नाही हे पाहून सासरच्या मंडळींनी खोटे आरोप केले. कशी नोकरी करतो म्हणत गाडीखाली मारण्याची धमकी दिली. आपल्या आत्महत्येस कृष्णाजी शिंदे व माधव शिंदे यांना जबाबदार धरावे, असेही चिठ्ठीत संतोषने म्हटले आहे.