जळगाव : गुजरातसह खान्देश आणि विदर्भातील प्रवाशांच्या सोयीसाठी हैदराबाद–सुरत दरम्यान नवीन विशेष रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी मागणी धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष तथा पश्चिम रेल्वेचे डीआरयूसीसी सदस्य महेंद्र एस. कोठारी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी हैदराबाद येथील दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य वाणिज्य प्रबंधक इती पांडे यांच्याकडे मागणी निवेदन सादर केले आहे.
सुरत–नंदुरबार–जळगाव–अकोला–नांदेड या मार्गावरील प्रवाशांसाठी हैदराबाद–सुरत विशेष रेल्वे अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे महेंद्र कोठारी यांनी निवेदनात नमूद केले आहे. सुरत तसेच गुजरातमधील विविध शहरांमध्ये हैदराबाद आणितेलंगणातून मोठ्या संख्येने कामगार रोजगारा निमित्त वास्तव्यास आहेत. त्याचप्रमाणे गुजरात, खान्देश आणि विदर्भातील अनेक कामगार, कर्मचारी, विद्यार्थी, व्यापारी तसेच इतर नागरिक रोजगार, शिक्षण व व्यवसायाच्या निमित्ताने हैदराबाद येथे नियमित प्रवास करतात.
सध्या या प्रवाशांना अनेकदा रेल्वे बदलावी लागते किंवा उपलब्ध गाड्यांच्या मर्यादित पर्यायांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे हैदराबाद–सुरत दरम्यान थेट विशेष रेल्वे सुरू झाल्यास या संपूर्ण पट्ट्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो. या रेल्वेमुळे गुजरात, खान्देश, विदर्भ आणि तेलंगणातील महत्त्वाच्या शहरांदरम्यान प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होईल. रोजगार, शिक्षण आणि व्यापारासाठी दोन्ही भागांत ये-जा करणाऱ्या प्रवाशांचीही मोठी सोय होणार आहे.
धरणगाव, अमळनेरला नव्या गाड्यांचे थांबे
याशिवाय जळगाव–उधना ताप्ती सेक्शनवर भविष्यात सुरू करण्यात येणाऱ्या सर्व नवीन रेल्वे गाड्यांना धरणगाव आणि अमळनेर येथे थांबा देण्यात यावा, अशी स्वतंत्र मागणीही धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष तथा पश्चिम रेल्वेचे डीआरयूसीसी सदस्य महेंद्र कोठारी यांनी केली आहे. धरणगाव आणि अमळनेर ही जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाची रेल्वे स्थानके असून या स्थानकांवरून एरंडोल, पारोळा, चोपडा तसेच धुळे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. या भागातील प्रवाशांसाठी धरणगाव व अमळनेर ही प्रमुख रेल्वे केंद्रे आहेत. मात्र नवीन गाड्यांना या स्थानकांवर थांबा न मिळाल्यास परिसरातील प्रवाशांना इतर स्थानकांवर जावे लागते.
ताप्ती सेक्शनवर भविष्यात नवीन रेल्वे सेवा सुरू होताना धरणगाव आणि अमळनेर येथे नियमित थांबे दिल्यास या भागातील प्रवाशांना थेट लाभ मिळेल. स्थानिक प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच व्यावसायिक वर्गासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचे कोठारी यांनी नमूद केले आहे. रेल्वे प्रशासनाने गुजरात, खान्देश, विदर्भ आणि तेलंगणातील प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन हैदराबाद–सुरत विशेष रेल्वे सुरू करण्याबरोबरच भविष्यातील नवीन रेल्वे गाड्यांना धरणगावसह अमळनेर येथे थांबे देण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशीही अपेक्षा महेंद्र कोठारी यांनी व्यक्त केली आहे.
