जळगाव : बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पदवीधर तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांनी कस्टमर सर्व्हिस असोसिएट (लिपिक) पदांच्या ११ हजार ४०३ जागांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे. देशभरातील विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ही भरती होणार असून, महाराष्ट्रासाठी तब्बल १,०५१ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
या भरती प्रक्रियेद्वारे देशातील विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. ज्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब अँड सिंध बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युको बँकेचा समावेश आहे. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना देशभरातील विविध शाखांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. भरती देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक १,७३१ जागा, त्यानंतर कर्नाटकात १,४१४, महाराष्ट्रात १,०५१ आणि पश्चिम बंगालमध्ये ९४६ जागा उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही भरती मोठी संधी मानली जात आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (एससी/एसटी) प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (ओबीसी) उमेदवारांना ३ वर्षांची वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार इतर राखीव प्रवर्गांनाही लागू असलेल्या सवलती मिळतील. निवड झालेल्या उमेदवारांना २४ हजार ५० रुपये ते ६४ हजार ४८० रुपये प्रतिमहिना इतके वेतन मिळणार आहे. याशिवाय विविध भत्ते आणि बँकिंग सेवेत उपलब्ध असलेल्या इतर सुविधांचाही लाभ मिळणार असल्याने ही भरती तरुणांसाठी आकर्षक ठरत आहे.
अर्ज करण्यासाठी २१ ऑगस्ट मुदत
सर्वसाधारण, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (यूआर, ओबीसी, ईडब्ल्यूएस) या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८५० रुपये, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग आणि माजी सैनिक (एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, ईएसएम) प्रवर्गातील उमेदवारांसाठी १७५ रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक माहिती आणि वैयक्तिक तपशील अचूक भरावेत. अर्जामध्ये कोणतीही चूक राहणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. बँकिंग भरतीसाठी १ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ ऑगस्ट २०२६ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आयबीपीएसच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
