नाशिक : महापालिकेवरील वाढते दायित्व कमी करण्यासाठी दोन्ही उड्डाण पुलांसह खर्चीक बाबींना कात्री लावली जात असताना दुसरीकडे उत्पन्न वाढविण्यासाठी आता तपोवनातील साधुग्रामची जागा तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर देण्याचा विचार केला जात आहे. दर बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळय़ात साधू-महंतांच्या वास्तव्यासाठी या जागेचा वापर केला जातो. साधुग्रामसाठीची सुमारे ३०० एकर जागा ना विकास क्षेत्रात समाविष्ट आहे. यामध्ये मनपाची सुमारे ५५ एकर जागा असून सिंहस्थ कुंभमेळा झाल्यानंतर ती पडीक असते. अर्थार्जनासाठी तिचा उपयोग केला जाणार आहे.
सध्या महापालिकेचे दायित्व २८०० कोटींवर पोहोचले आहे. स्थानिक संस्था कर रद्द झाल्यानंतर भरपाईपोटी जीएसटी अनुदान मिळते. मालमत्ता कर किंवा पाणीपट्टी वाढविण्यास सत्ताधाऱ्यांकडून विरोध केला जातो. नगररचना शुल्क, जाहिरात कर, भाडेतत्त्वावर दिलेल्या मालमत्ता आदींतून उत्पन्न मिळते. तथापि, खर्चाच्या तुलनेत उत्पन्नाचे स्रोत मर्यादित राहिल्याने महापालिका आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच कारणास्तव २५० कोटींच्या प्रस्तावित उंटवाडी आणि मायको चौक या दोन उड्डाण पुलांवर फुली मारताना दादासाहेब फाळके स्मारकाच्या नूतनीकरणाचे काम खासगी संस्थेऐवजी मनपाकडून करण्याचे निश्चित झाले आहे. अनावश्यक कामांना कात्री लावताना मनपाच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी अन्य पर्याय शोधले जात आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत साधुग्रामची जागा तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर देण्याचा पर्याय समोर आला. सिंहस्थ कुंभमेळय़ातील दीड-दोन वर्ष वगळता उर्वरित काळात मनपाची जागा पडून असते. मंगल कार्यालये किंवा तत्सम बाबींसाठी ती तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर देता येईल. त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकेल. शिवाय संपादित न झालेली खासगी जागा भाडेतत्त्वावर देताना परवानगी देऊन मनपाला शुल्क आकारता येईल. असा विचार होत आहे.
सद्य:स्थिती काय ?
तपोवन परिसरात साधुग्रामसाठी सुमारे ३५० एकर जागा आरक्षित आहे. ही संपूर्ण जागा आधीच ना विकास क्षेत्र म्हणून जाहीर झालेली आहे. यातील सुमारे ५५ एकर जागा मनपाची असून उर्वरित ४२ शेतकऱ्यांच्या जागेचे संपादन बाकी आहे. मागील कुंभमेळय़ात भूसंपादनासाठी चार पट चटईक्षेत्र (टीडीआर) देण्याची योजना जाहीर झाली होती. नव्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार दोनपट चटई क्षेत्र मिळू शकणार आहे. त्यास शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. यातील काही जागा राजकीय पदाधिकाऱ्यांची असल्याचे सांगितले जाते. शेतकरी आपल्या जागेवर आजही शेती करतात.
तपोवनमधील साधुग्राम परिसरात महापालिकेची सुमारे ५५ एकर जागा आहे. सिंहस्थ कुंभमेळय़ाचा कालावधी वगळता इतर काळात मंगल कार्यालय वा तत्सम बाबींसाठी तिचा तात्पुरत्या स्वरूपात वापर करता येईल. त्यातून मनपाच्या उत्पन्नात भर पडू शकेल. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हा पर्याय सुचवला आहे. मनपाच्या जागेचे महापालिकेला उत्पन्न मिळेल. साधुग्राममधील खासगी जागा भाडेतत्त्वावर देण्यास परवानगी देऊन मनपास शुल्क मिळू शकते.-रमेश पवार (आयुक्त, नाशिक महापालिका)