नाशिक – नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका कायमच वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांमुळे प्रसिध्दीत असतो. इगतपुरी तालकु्यात नुकत्याच घडलेल्या घटनेने शिक्षण क्षेत्र हादरले आहे. इगतपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सरकारी मुलांच्या वसतिगृहात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इगतपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सरकारी मुलांच्या वसतिगृहातील या घटनेत पीडितही विद्यार्थी आणि संशयितही विद्यार्थीच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याचा हा प्रकार आहे.

इयत्ता १० वीमध्ये शिकणाऱ्या सात मुलांनी इयत्ता पाचवी ते आठवीतील आठ मुलांना गुंगीकारक औषध देऊन त्यांच्यावर सात महिन्यांपासून वेळोवेळी अनैसर्गिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी सात विधीसंघर्षीत बालकांसह, माहिती लपवल्याप्रकरणी वसतिगृह अधीक्षकावरही गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी येथील रेल्वे लायब्ररीजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सरकारी मुलांच्या वसतिगृहात हा प्रकार घडला.

या वसतिगृहात राहणाऱ्या इयत्ता १० वीमधील सात विधीसंघर्षीत मुलांनी संगनमत करून हा गुन्हा केला. इगतपुरी तालुक्यातील एका गावातील फिर्यादीची दोन मुले आणि इतर सहा अशी एकूण आठ अल्पवयीन मुले त्यांच्यापेक्षा वरिष्ठ विद्यार्थ्यांच्या अत्याचाराला बळी पडली आहेत. ही मुले इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये शिक्षण घेत आहेत. संशयित मुलांनी त्यांच्यापेक्षा लहान मुलांना काहीतरी गुंगीकारक औषध देऊन त्यांच्यावर वेळोवेळी अनैसर्गिक अत्याचार केले. हा प्रकार २७ फेब्रुवारी २०२६ पूर्वी सुमारे सात महिन्यांपासून वेळोवेळी घडत होता.

मुलांनी या त्रासाबाबत वसतिगृहाचे अधीक्षक सुशांत दुधसागरे यांना माहिती दिली होती. मात्र, अधीक्षकांनी ही माहिती पोलिसांना कळविणे आवश्यक असतानाही ती दडवून ठेवली, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी तीन मार्च रोजी सायंकाळी इगतपुरी पोलीस ठाण्यात रजिस्टर क्रमांक १३१/२०२६ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामध्ये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३: कलम ३५२, ३५१(२)(३).पोक्सो कायदा २०१२: कलम ४, ६, ८, २१.महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक अधिनियम १९९९: कलम ४ या कलमांन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि इगतपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एस. व्ही. अहिरराव यांनी तातडीने वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक के. पी. भोजणे या करीत आहेत. या घटनेमुळे सरकारी वसतिगृहातील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.