नाशिक – इगतपुरी तालुका हा भात उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात केवळ २० टक्के भातपीक उरल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडे अत्यंत कमी प्रमाणात भात शिल्लक असल्याने भात महागण्याची शक्यता आहे.

भाताला ८० किलोच्या पोत्यामागे सहा हजार रुपये भाव द्यावा, तसेच भाताला हमीभाव मिळावा, अशी मागणी इगतपुरी तालुका शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात भाताच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाताच्या भाव वाढीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्याचा निर्णय घोटी येथे झालेल्या शिंदे गटाच्या आढावा बैठकीत घेण्यात आला.

इगतपुरी तालुका हा भात उत्पादनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे आर्थिक गणित भातशेतीवर अवलंबून आहे. यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे भातपिकाचे सुमारे ८० टक्के नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, उरलेल्या भाताला योग्य बाजारभाव मिळणे आवश्यक असल्याची भूमिका घोटी येथे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शिंदे गटाच्या आढावा बैठकीत मांडण्यात आली. या बैठकीत भात उत्पादकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भाताला ८० किलोच्या पोत्यामागे सहा हजार रुपये भाव मिळावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच इंद्रायणी आणि १००८ या भाताच्या वाणांनाही योग्य बाजारभाव मिळण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता शासनाने भाताला हमीभाव निश्चित करावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक आधार द्यावा. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. यावेळी माजी आमदार पांडुरंग गांगड, तालुकाप्रमुख देविदास जाधव, उपजिल्हाप्रमुख संपत काळे, उपजिल्हाप्रमुख रघुनाथ तोकडे, सोमनाथ जोशी, घोटी शहराध्यक्ष तानाजी रुमणे, खंडूशेट धांडे, विकास शिरसाठ, दत्ता गुंजाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या वर्षी पावसाच्या अनियमिततेचा इतर पिकांप्रमाणे भात पिकालाही मोठा फटका बसला आहे. इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे सर्व आर्थिक गणित भातशेतीवर अवलंबून आहे. कमी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने भात उत्पादक संकटात सापडले आहेत. भात उत्पादकांना योग्य बाजारभाव आणि शासनाकडून दिलासा मिळणार का, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.