नाशिक – नाशिकच्या औद्योगिक पट्ट्यासाठी आणि संपूर्ण वाहन उद्योगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे. यामुळे आपल्या विभागाचा आर्थिक विकास वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आपल्या मालवाहतूक कार्यात महत्त्वपूर्ण चालना देत, मध्य रेल्वेने नव्याने अधिसूचित केलेल्या इगतपुरी गुड्स शेडमधून वाहनांची पहिली लोडिंग यशस्वीरित्या सुरू केली आहे. या ऐतिहासिक टप्प्यामुळे आता नाशिकमधून थेट देशाच्या इतर भागांत वाहनांची वाहतूक करणे अधिक सोपे आणि जलद झाले आहे.
या महत्त्वपूर्ण सेवेसाठी पहिली मागणी मे. ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (टीसीआय) यांनी नोंदवली. या उपक्रमामुळे या भागातील लॉजिस्टिकल कार्यक्षमतेत एक नवा अध्याय सुरू झाला आहे. वाहनांच्या सुरक्षित आणि कार्यक्षम वाहतुकीसाठी खास तयार केलेल्या २५ एनएमजी (न्यू मॉडिफाइड गुड्स) वॅगनमध्ये एकूण १०० गाड्या वाहतुकीसाठी लोड करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या लोड केलेल्या वाहनांमध्ये नाशिकमधील महिंद्रा अँड महिंद्राच्या प्रकल्पातून थेट आणलेल्या विविध प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे.
आर्थिक लाभ आणि गती शक्ती संकल्पना
उत्तर पूर्व रेल्वेच्या नौतनवा गुड्स टर्मिनलकडे रवाना होणाऱ्या या रेकमधून प्रति रेक अंदाजे १७ लाख १६ हजार ७५० रुपयांचा घसघशीत महसूल मध्य रेल्वेच्या तिजोरीत जमा होण्याचा अंदाज आहे. ‘गती शक्ती’ या संकल्पनेअंतर्गत, मध्य रेल्वेचा मुंबई विभाग आपला मालवाहतुकीचा वाटा वाढवण्यासाठी सातत्याने नवनवीन वस्तू आणि बाजारपेठांमध्ये प्रवेश करत आहे. इगतपुरी गुड्स शेडचा ऑटोमोबाईल लोडिंगसाठी वापर केल्यामुळे नाशिकमधील उत्पादकांसाठी एक अधिक सुलभ आणि सुव्यवस्थित लोडिंग पॉईंट उपलब्ध झाला आहे. यामुळे उत्पादकांच्या लीड टाईम्स आणि लॉजिस्टिकल खर्चात मोठी बचत होणार आहे.
पर्यावरणासाठीही फायदेशीर
रस्त्यावरील अवजड वाहतुकीच्या तुलनेत रेल्वे वाहतुकीमुळे कार्बन उत्सर्जनात मोठी घट होते. तसेच, महामार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होते. ऑटोमोबाईल वाहतुकीसाठी रस्त्यावरून रेल्वेकडे होणारा हा बदल केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे, तर मोठ्या प्रमाणातील (बल्क) लॉजिस्टिक्ससाठी एक अधिक शाश्वत, जलद आणि किफायतशीर पर्याय ठरत आहे.
ऑटोमोबाईल लोडिंगसाठी इगतपुरी गुड्स शेडची अधिसूचना ही मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीच्या क्षेत्रात विविधता आणण्याच्या आणि वाहन उद्योगासाठी संपूर्ण उपाययोजना (एंड-टू-एंड सोल्यूशन्स) पुरवण्याच्या चालू प्रयत्नांचाच एक भाग आहे. याविषयी माहिती देताना मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी हा उपक्रम मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीला एक नवी, उज्ज्वल दिशा देणारा आणि ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी वरदान ठरणार असल्याचे म्हटले आहे.
