नाशिक – इगतपुरी तालुक्यातील भावली धबधबा परिसरात भ्रमंतीसाठी गेलेल्या पर्यटकांवर हल्ला करून नंतर १० ते १२ किलोमीटर पाठलाग करीत त्यांच्या वाहनाची तोडफोड केल्याच्या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी नऊ संशयितांना ताब्यात घेतले आहे. यातील एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल आहे. तर फरार असणाऱ्या एकाचा भिवंडी, वाडा परिसरात शोध घेतला जात आहे.
या कारवाईची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुसळधार पावसानंतर इगतपुरी व त्र्यंबकेश्वर परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. या भागात मद्यपान करून टवाळखोरांकडून अनेकदा गोंधळ, धुडगूस घालण्याचे प्रकार घडले आहेत. इगतपुरी लगतच्या भावली धरण परिसरात रविवारी नाशिकमधील कुटुंबिय फिरण्यासाठी गेले होते. तेव्हा हा प्रकार घडला. छेड काढल्याचा जाब विचारल्यानंतर टोळक्याने कुटुंबाला धक्काबुक्की केली. यामुळे घाबरून संबंधित कुटुंब आपल्या मोटारीतून मार्गस्थ झाले. नंतर या टोळक्याने त्यांचा पाठलाग करून वाहनाची तोडफोड केली. या घटनेमुळे भेदरलेले हे कुटुंबिय थेट नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात पोहोचले. या प्रकरणी दाखल झालेला गुन्हा इगतपुरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी हत्येचा प्रयत्न, दरोडा, विनयभंग अशी कलमे लावण्यात आली आहेत.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि व्हिडिओ फुटेजच्या मदतीने तपास करून आतापर्यंत नऊ संशयितांना ताब्यात घेतले आहेत. हे सर्व संशयित इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो, बलायदुरी, देवळे घोटी, माणिक खांब, गिरणारे या आसपासच्या गावांतील असून एकमेकांचे परिचित आहेत. यातील एका संशयितावर २०२० मध्ये हत्येचा गुन्हा दाखल होता. तक्रारदारांनी तक्रारीत सात ते आठ संशयित म्हटले होते. परंतु, पोलिसांनी आरोपींना गुन्ह्यात मदत करणारे, आश्रय देणारे व पळून जाण्यास मदत करणाऱ्यांचाही शोध घेऊन त्यांना गुन्ह्यात समाविष्ट केल्याचे पोलीस अधिक्षक डॉ. स्वामी यांनी सांगितले.
दोनदा वादाच्या घटना…
आरोपींनी एका व्यक्तीला शिट्टी वाजवण्यास सांगितल्यावरून सुरुवातीला वाद झाला. तो व्यक्ती निघून गेल्यावर तेथील इतर स्थानिक लोकांनी पर्यटकांशी पुन्हा वाद घातला. त्यातून ही तोडफोडीची व हल्ल्याची घटना पुढे सात ते आठ किलोमीटर अंतरावर घडली. जिथे प्रारंभी वाद झाला, तिथे पोलीस बंदोबस्तही होता. पोलीस चौकीही आहे. पहिले वादावादीचे ठिकाण धरण परिसरात होेते. या वादाचे पर्यावसन पुढे सात ते आठ किलोमीटर अंतरावर झाले. जिथे रस्त्यावर टोळक्याने गाडीवर हल्ला केला, काचा फोडल्या. पोलिसांच्या ११२ क्रमांकाच्या वाहनाने तक्रारदारांशी संपर्क केला होता. परंतु, ते इतके वेगात पुढे निघून गेले होते. त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. असे नाशिकचे पोलीस अधिक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी सांगितले.
सर्व आरोपी इगतपुरीतील
या गुन्ह्यात आतापर्यंत अटक केलेले सर्व आरोपी इगतपुरी तालुक्यातील आहेत. यामध्ये विशाल भटाटे (२७, गिरणारे), अनिकेत मानवेढे (२४, गिरणारे), अनिरुद्ध भागडे (२५, नांदगाव सदो), सागर उर्फ लोकेश गिते (२२, माणिक खांब), विनोद बोराडे (२६, इगतपुरी गावठाण), सचिन आडोळे (२९, माणिक खांब), अर्जुन आडोळे (२५, माणिक खांब) आणि देविदास भगत (२५, बलायदुरी) यांचा समावेश असल्याची माहिती इगतपुरी पोलिसांनी दिली. एक संशयित फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
