११५ विद्यार्थ्यांना शिकविण्याची दोन शिक्षकांची कसरत

आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी कोटय़वधींचा खर्च करण्यात आल्याचा डांगोरा शासन यंत्रणा पिटत असली तरी प्रत्यक्षात योजना केवळ कागदापुरतीच मर्यादित राहिली आहे. इगतपुरी तालुक्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळेचा कारभार शिक्षकाविना रामभरोसे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दोन शिक्षकांना ११५ विद्यार्थ्यांना शिकविण्याची कसरत करावी लागत आहे.

इगतपुरीच्या भावलवाडी व भावली बुद्रुक या गावात जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. कुठलीही पूर्वसूचना न देता भावलवाडी येथील शाळा तेथील दोन शिक्षकांची बदली झाल्यामुळे अकस्मात बंद करण्यात आली. इगतपुरीच्या शिक्षण विभागाने बदल्या करताना या भागात नव्याने शिक्षकांची नेमणूक केली नाही, म्हणून भावली बुद्रुक ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्थानिक स्तरावर विनामोबदला शिकवणाऱ्या एका शिक्षिकेला मानसेवी पदावर शिकवण्यास सांगितले होते. एकच खासगी शिक्षिका ११५ विद्यार्थ्यांना शिकवताना मेटाकुटीला येत असे. त्यातच इगतपुरीच्या शिक्षण विभागाने लगतच्या भावलवाडी शाळेला टाळे ठोकून त्या शाळेतील २ शिक्षक, ४ वर्ग आणि ३३ विद्यार्थी यांना भावली बुद्रुकच्या शाळेत स्थलांतरित केले. आता भावलवाडी येथील दोन शिक्षक रोज आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन पायपीट करत भावली बुद्रुक शाळेत येतात. दोन्ही शाळांतील इयत्ता पहिली ते सहावीच्या ११५ विद्यार्थ्यांना शिकविण्याचा आटापिटा केला जातो.

जिल्ह्य़ात शिक्षकांची उपलब्धता झाल्याने काही दिवसांत समायोजनाद्वारे या शाळेतील शिक्षकांच्या पूर्ण जागा भरण्यात येणार असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान, भावलवाडी येथील शाळा बंद करून ती शाळा भावली बुद्रुक शाळेत विलीन करण्याची कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्य़ात आंतरजिल्हा बदल्यांनी शिक्षकांची मुबलक उपलब्धता झाली असली तरी आदिवासी भागात शिक्षकांना शाळा निश्चित केल्या गेल्या नाहीत. परिणामी, त्याची शिक्षा विद्यार्थ्यांना मिळत असल्याचे चित्र आहे.

या संदर्भात गटशिक्षणाधिकारी शिवाजी आहेर यांनी आंतरजिल्हा बदली झाल्याने भावली बुद्रुक शाळेतील शिक्षकांना कार्यमुक्त करावे लागले. जागा रिक्त राहू नये म्हणून पर्यायी मार्ग काढावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

शिकविताना दमछाक

आज दोन्ही शाळांतील इयत्ता पहिली ते सहावीच्या ११५ विद्यार्थ्यांना केवळ दोन शिक्षक शिकवत आहे. कोणत्याही एका वर्गात अध्यापन सुरू असताना अन्य वर्गात दंगामस्ती, गोंधळ सुरू आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून डिजिटल शाळेचे स्वप्न पाहणाऱ्या शिक्षण विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित होत आहे. या विद्यार्थ्यांना शिकविताना तारेवरची कसरत सुरू असूनही शिक्षण विभागाला जाग आली नसल्याची पालकांची तक्रार आहे.

शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा

शिक्षक नसल्याने दोन शाळांच्या एकत्रीकरणाचा तोडगा शिक्षण विभागाने काढला असला तरी दोन शिक्षकांवर सर्व मदार आहे. शिक्षण विभागाच्या कार्यशैली विरोधात सामाजिक संघटना सक्रिय झाल्या असून जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.