जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद येथील वाघूर नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा होत आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असतानाही महसूल प्रशासनातर्फे कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाघूर नदीपात्रातून दिवस-रात्र वाळू उत्खनन सुरू आहे. वाळूच्या अवजड वाहतुकीमुळे शेतरस्त्यांची स्थिती बिकट झाली आहे, तसेच नदी-नाल्यांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता घटत आहे.
ओढ्यांसह नाल्यांची वाळू बांधकामासाठी निकृष्ट समजली जाते. तरीही वाळूमाफिया बांधकाम व्यावसायिकांना दलाली देऊन नागरिकांना वेठीस धरत आहेत. ठेकेदार व बांधकाम व्यावसायिक सरकारी बांधकामात मातीमिश्रित वाळू वापरत आहेत. त्यामुळे गुणवत्तेचा प्रश्नही निर्माण होतो. वाघूर नदीपात्रातील वाळू उपशाबरोबरच वीटभट्टीसाठी लागणार्या माती उपशासाठी काही शेतांतील मातीचा उपसा होत आहे. वाकोद शिवारातील श्रीक्षेत्र चौंडेश्वर, आड नदीचा पूल येथून मोठ्या प्रमाणात वाळू व मातीचा उपसा करून नदीपात्रातच वीटभट्ट्या सुरू करण्यात आल्या आहेत, तर दरवर्षी नदीपात्र पोखरून तेथे अतिक्रमण करून शेती करण्यात येते.




हेही वाचा >>> मुद्रणालय कामगारांना १६ हजार रुपये दिवाळी बोनस
फर्दापूर, धनवट, वाकोद, वडगाव, पिंपळगाव, पहूर, नेरी या नदीकाठावरील भागात मोठ्या प्रमाणात वाळू व मातीचा उपसा होत आहे. विशेष म्हणजे या गावांनी काही काळापूर्वी अवैध वाळू उपशाला विरोध केला होता. त्याच गावांमध्ये वाळू तस्करी फोफावली आहे. गाव हद्दीतील नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन रोखणे तसेच वाहने ताब्यात घेऊन पोलीस, तलाठी, तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे सर्वाधिकार ग्रामसंरक्षण दलांना द्यावे, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे. याकडे स्थानिक तलाठी व तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.