नाशिक – सुरगाणा तालुक्यात तहसीलदारांनी धान्याची मालमोटार पकडली असून, या मालमोटारीतून अवैधपणे धान्याची वाहतूक केली जात असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाली आहे. तहसीलदार रामजी राठोड हे तपास करत असून सायंकाळी उशिरापर्यंत संबंधित व्यापाऱ्याची चौकशी करण्यात येत होती.
जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी राज्य सहकारी आदिवासी महामंडळाच्या नाशिक कार्यालयाने खरेदी केलेले धान्य गुजरातच्या काळ्या बाजारात परस्पर विक्री होत असल्याचे प्रकरण उघड झाले होते. २०१४ मध्ये सुरगाणा तालुक्यात धान्य घोटाळा उघडकीस आला होता.
ऑगस्ट ते नोव्हेंबर २०१४ या चार महिन्यांच्या कालावधीत तालुक्याला आलेले धान्य आणि गोदामातील साठ्याचा ताळमेळ लागत नसल्याचे निदर्शनास आले होते. अन्नधान्य महामंडळातून पाठविण्यात येणारे रेशनचे धान्य प्रत्यक्षात सुरगाण्याच्या शासकीय गोदामात न जाता,ठेकेदाराच्या मदतीने काळ्या बाजारात विक्रीसाठी नेले जात होते. या घटनेत शासनाचे सव्वासात कोटी रुपयांच्या धान्याचा अपहार झाल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी तहसीलदारांसह १३ जणांना निलंबित करण्यात आले होते. यानंतरही अनेकदा सुरगाणा तालुक्यातून धान्य अपहाराच्या तक्रारी पुढे आल्या. त्यामुळे आता प्रशासनही खडबडून जागे झाले असून, तहसीलदारांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत.
उंबरठाण येथे एका मालमोटारीतून धान्याची वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार मालमोटार ताब्यात घेण्यात आली आहे. मालमोटार ज्या व्यापाऱ्याची आहे, त्याचीही चौकशी करण्यात येईल. – रामजी राठोड (तहसीलदार, सुरगाणा)
