मालेगाव : मालेगाव व परिसरातील तालुके तसेच खान्देश व मराठवाडा भागात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड करून मालेगाव शहरात लाकूड तस्करी केली जात असल्याची तक्रार मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे निमंत्रक निखिल पवार यांनी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून लाकूड तस्करांनी घातलेल्या धुमाकुळामुळे एकेकाळी हिरवळीने नटलेला मालेगाव तालुका आता हळूहळू वाळवंटाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा इशारा देखील पवार यांनी दिला आहे.

लाकूड तस्करी व मालेगाव तालुक्यातील जंगलांच्या विदारक स्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निखिल पवार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना सविस्तर निवेदन पाठवले आहे. या निवेदनात त्यांनी वनविभागाच्या संशयास्पद भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.मालेगाव तालुक्याच्या संदर्भात पाहिले असता, कागदोपत्री सुमारे ३३ हजार हेक्टर वनजमीन असली तरी, प्रत्यक्षात या वनक्षेत्रापैकी केवळ दीड ते दोन हजार हेक्टर क्षेत्रावरच झाडे शिल्लक असल्याचे दिसून येते. स्थानिक तसेच शेजारच्या जिल्ह्यांतून होणारी लाकूड तस्करी चिंतेचा विषय झाली असून वनविभागाकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे,असा आरोपही पवार यांनी केला आहे.

लाकूड तस्कर मोकाट

मालेगाव शहरात सध्या ४१ लाकूड गिरण्या, १५० हून अधिक लाकूड प्रक्रिया उद्योग तसेच शंभरावर सायझिंग युनिट्स कार्यरत आहेत. या सर्व उद्योगांसाठी दररोज मोठ्या प्रमाणावर लाकडाची आवश्यकता असते. ही गरज भागवण्यासाठी मालेगावसह आजूबाजूच्या तालुक्यांमधून तसेच धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आदी भागांतून विनापरवाना मोठ्या प्रमाणावर लाकूड तस्करी केली जाते. मात्र, ही तस्करी रोखण्यासाठी वनविभागाकडून ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत, असा आरोप पवार यांनी केला आहे.

जागरूक नागरिकांनी तस्करीची माहिती दिल्यानंतरही केवळ जुजबी कारवाई केली जाते, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. तस्करांकडून लाकूड ताडपत्रीने झाकून वाहनांमधून शहरात आणले जाते. अनेक वाहनांवर नंबर प्लेट नसतात किंवा त्या पुसट असतात. तरीदेखील अशा वाहनांवर परिवहन विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याची प्रचिती येत आहे. त्यामुळे या गोरखधंद्याला अभय देण्याचे कारण काय, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे.

वृक्ष लागवड होते पण,संवर्धनाचे काय ?

अवैध वृक्षतोडीमुळे जंगले वेगाने नष्ट होत असून, वन्यजीव मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे मानव–वन्यजीव संघर्षाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. दरवर्षी वनक्षेत्रात मोठा खर्च करून वृक्षारोपण केले जाते; मात्र लागवड केलेल्या वृक्षांचे योग्य संवर्धन होत नसल्याचे चित्र आहे. याशिवाय वनजमिनीवर होणारे अवैध गौण खनिज उत्खनन हा देखील गंभीर प्रश्न बनला आहे. मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या या उत्खननामुळे डोंगर अक्षरशः नष्ट होत आहेत. वनविभागाचे दुर्लक्ष तसेच लाकूड तस्कर व भूमाफियांशी असलेले कथित साटेलोटे यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

आंदोलनाचा इशारा

अवैध पद्धतीने सुरू असलेल्या शहरातील लाकूड गिरण्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करावेत, लाकूड तस्करांवर कठोर कारवाई करावी, एकाच ठिकाणी तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या कराव्यात, तसेच लाकूड तस्करी रोखण्यासाठी व जंगले वाचवण्यासाठी मालेगाव येथे स्वतंत्र शस्त्रधारी भरारी पथक स्थापन करावे, अशा मागण्या निखिल पवार यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत. वन प्रशासनाने या संदर्भात तातडीने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर वनविभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.