नाशिक – सुरेश मालेगावकर, संजय गणोरकर, राजेंद्र शिवदे, ज्योत्स्ना पवार, उमेश तोरणे आणि मिलिंद देशमुख या डाॅक्टरांची इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिक शाखेच्यावतीने डॉक्टर्स डेनिमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
आयएमए नाशिक शाखेतर्फे दरवर्षी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. २०२५ वर्षाच्या पुरस्कारांची घोषणा निवड समितीने केली. या पुरस्कारार्थी डॉक्टरांचा सत्कार मंगळवारी सायंकाळी आठ वाजता शालिमार येथील आयएमए सभागृहात आयोजित सोहळ्यात केला जाणार आहे, अशी माहिती आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. नीलेश निकम, सचिव डॉ. मनिषा जगताप यांनी दिली. पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, डॉ. जयंतीलाल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
पुरस्कार निवड समितीत रमेश मंत्री, अनिल कासलीवाल, आवेश पलोड, आयएमए नाशिकचे अध्यक्ष नीलेश निकम, सचिव मनिषा जगताप या डाॅक्टरांचा समावेश आहे. कार्यक्रमास आयएमएच्या सदस्य डॉक्टरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.