धुळे: जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाकपाडा शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला. कारवाईत २४ लाख ७२ हजार ५४० रुपयांच्या मुद्देमालासह एका संशयिताला अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धुळे जिल्हा अधीक्षक स्वाती काकडे यांनी संपूर्ण जिल्ह्यात अवैद्य मद्य निर्मिती, विक्री व वाहतूकविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. धुळे जिल्ह्यातील वाकपाडा शिवारात रविवारी छापा टाकण्यात आलाा. या ठिकाणी पथकाने केलेल्या तपासणीत महाराष्ट्रात प्रतिबंध असलेल्या विदेशी मद्याचा साठा आढळला. गोवानिर्मित हे मद्य विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली. गोदामात वेगवेगळ्या दोन ठिकाणी ताडपत्रीने झाकलेले खोके तपासले असता त्यात गोवा राज्य निर्मित एकूण २४ लाख ७२ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल पथकाच्या हाती लागला. याप्रकरणी संशयित अमोल पाटील यास अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : नाशिक : स्वातंत्र्यदिनी हजारो शेतकऱ्यांकडून नादारीची घोषणा, शेतकरी समन्वय समितीचा निर्णय

ही कारवाई भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक एस. एस. शिंदे, निरीक्षक आर. आर. धनवटे, देविदास नेहुल, ए. पी. मते, अभिजित मानकर, एस. एस. आवटे, पी. एस. धाईजे, बी. एस. चोथवे आदींनी केली. अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतूक संबंधित कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा ८४२२००११३३ या व्हाॅटसअप क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून त्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.