धुळे : खान्देशातील पारंपरिक खापरावर भाजलेली भलीमोठी पुरणपोळी (मांडा) आणि पारंपरिक बैलगाडीवरील स्वागत मिरवणूक अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना विशेष भावली. खास खान्देशी पद्धतीने चुलीवर तापवलेल्या मातीच्या खापरावर टाकून भाजली जाणारी पुरणपोळी पाहताच ती स्वतः बनविण्याचा मोह सोनाली कुलकर्णी यांना आवरता आला नाही. त्यांनी पाटावर विशिष्ट पद्धतीने बसून स्वतः पोळी हातांवर फिरवून खापरावर टाकली आणि नंतर तिचा आस्वादही घेतला. या स्वादिष्ट, रुचकर पुरणपोळीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये रचनात्मक, नाविन्यपूर्ण आणि लोकसहभागातून होणाऱ्या विकासकामांमुळे गावागावात परिवर्तनाचे चित्र दिसून येत आहे. या अभियानामुळे केवळ विकासकामेच नव्हे, तर विकासाची लोकचळवळ उभी राहिली असल्याचे स्पष्टपणे जाणवत असल्याच्या भावना प्रख्यात मराठी सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या. नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन मिळावे, तसेच लोकसहभाग वाढावा या उद्देशाने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी बुधवारी (दि. २१) खलाणे (ता. शिंदखेडा), वाठोडे तसेच बोराडी (ता. शिरपूर) या ग्रामपंचायतींना भेट देत विकासकामांची पाहणी केली.
या दौऱ्यात त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्नेहा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजय पडोळ, गटविकास अधिकारी प्रदीप पवार, रमेश नेतनराव, धुळे गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
खलाणे येथे बैलगाडीवरून मिरवणूक-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या धुळे जिल्हा दौऱ्याची सुरुवात बुधवारी सकाळी खलाणे (ता. शिंदखेडा) येथून झाली. ग्रामस्थांच्या वतीने सजवलेल्या पारंपरिक बैलगाडीतून त्यांची स्वागत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सोनाली कुलकर्णी म्हणाल्या की, खलाणे गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत केलेल्या कामांची राज्यस्तरावर चर्चा सुरू आहे. प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे यश मिळाले असून, या अभियानाच्या माध्यमातून येथे विकासाची लोकचळवळ निर्माण झाल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे अशा शब्दात त्यानी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच नारायणसिंग चौधरी व ग्रामपंचायत अधिकारी शरद कोळी यांनी त्यांचा सत्कार केला.
खान्देशी पुरणपोळीचा आस्वाद-
खान्देशी परंपरेनुसार खापरावर भाजली जाणारी भलीमोठी पुरणपोळी सोनाली कुलकर्णी यांनी स्वतः बनवून पाहिली. त्यानंतर त्यांनी त्या स्वदिष्ट आणि रुचकर पुरणपोळीचा आस्वाद घेत समाधान व्यक्त केले. स्थानिक संस्कृती, खाद्यपरंपरा आणि ग्रामजीवनाशी असलेले नाते अधिक दृढ होत असल्याचे यावेळी दिसून आले.
खलाणे, वाठोडे आणि बोराडी या ग्रामपंचायतींमधील विकासकामांची पाहणी करताना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे ग्रामीण भागात सकारात्मक परिवर्तन घडत असून लोकसहभागातून विकास साधता येतो, याचा प्रत्यय आल्याचेही सोनाली कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.
