धुळे : साक्री तालुक्यातील गणेशपूर गावाच्या शिवारात रविवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. कांदा भरण्यासाठी आणण्यात आलेले एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत पडले. या हृदयद्रावक घटनेत ट्रॅक्टरवर बसलेल्या प्रत्येकी तीन वर्षे वयाच्या दोन मुली कठडा नसलेल्या ५० फूट खोल आणि पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दुजोरा दिला असला तरी अधिकृत तपशील अद्याप मिळाला नाही.

खुशी दाजू ठाकरे (३) व ऋतिका संदीप गायकवाड (३) अशी पाण्यात बेपत्ता झालेल्या बालकांची नावे आहेत. या घटनेत परी संदीप गायकवाड (२) या बालकेस वाचवण्यात यश आले. या बालकांशिवाय आणखी किती मुले ट्रॅक्टर मध्ये होती याबद्दल कुणालाही काही ठोस माहिती नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार साक्री पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गणेशपूर गावाजवळ प्रकाश मराठे यांच्या शेतात कांदा भरण्यासाठी ट्रॅक्टर उभा करण्यात आला होता. विहिरीच्या शेजारी ट्रॅक्टर थांबलेले असताना ते कुणाला काही कळण्याच्या आत अचानक उत्तर दिशेने गेले आणि थेट विहिरीत जाऊन पडले.यामुळे मोठा आवाज झाल्याने परिसरातील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, पण तोवर ट्रॅक्टर खोल पाण्यात बुडाले होते. घटनास्थळी असलेल्या काहींच्या म्हणण्यानुसार अपघाताच्या वेळी त्या ट्रॅक्टरवर दोन अल्पवयीन मुली बसलेल्या होत्या.यामुळे ट्रॅक्टरसह त्या दोघीही विहिरीत पडल्याची प्राथमिक माहिती आणि भीती व्यक्त केली जाते आहे.

सदर विहीर सुमारे ५० फूट खोल असून ती पूर्णपणे पाण्याने भरलेली आहे. अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व तत्काळ क्रेन मागवून ट्रॅक्टर बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. एकाच वेळी विहिरीत पडलेल्या मुलींचा शोध घेण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. आहे. या घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

बचावपथकाच्या मदतीने शोधमोहीम सुरू असून अधिक तपशील मिळविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे गणेशपूर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शोध आणि बचावकार्य वेगाने सुरू असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, अपघात नेमका कसा घडला याचा तपास साक्री पोलीस करीत आहेत. ट्रॅक्टर अचानक चालू कसा झाला, तो हातब्रेकला लावलेला होता की नाही, अथवा त्यामध्ये काही यांत्रिक बिघाड झाला होता का, याचीही चौकशी केली जात आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या शेतमजुरांचे व गावकऱ्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून त्याआधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, विहिरीच्या काठावर मोठी गर्दी जमली असून महिलांचा आक्रोश सुरू आहे. बहुतांश नागरिक बचावकार्यात मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. संशयित मुलींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून त्यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल होत आहेत. प्रशासनाकडून घटनास्थळी आवश्यक ती सर्व मदत पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले असून बचावकार्यात कोणतीही हलगर्जीपणा करू नये असे वरिष्ठाकडून आदेश देण्यात आले आहेत.यासंदर्भात अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही, पण पोलिसांनी या घटनेची गंभीर नोंद घेणे सुरु केले आहे.