धुळे : विद्यार्थ्याला एखाद्या प्रश्नाचे उत्तर देता न येणे, यात काहीही विशेष नाही. परंतु, धुळे जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी घेतलेल्या तोंडी परीक्षेत जेव्हा शाळेच्या मुख्याध्यापकालाच कोणतेही उत्तर देता आले नाही, तेव्हा सर्वच चकित झाले. त्यामुळे शेवटी जे व्हायचे तेच झाले. तोंडी परीक्षेत नापास झालेल्या या मुख्याध्यापकास निलंबित व्हावे लागले. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी जुलै २०२३ पासून मिशन उत्कर्ष हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता उंचावणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनस्त निश्चिती, उपचारात्मक अध्ययन, अध्यापन शिक्षक, मित्र पुस्तिकांबाबत मार्गदर्शन, कार्यशाळा, शिक्षण परिषदांमधून मार्गदर्शन, शिष्यवृत्ती सराव परीक्षा , शैक्षणिक ग्रामसभा, अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन ( भविष्यवेधी प्रशिक्षण) आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सातत्याने जिल्हास्तरावरून पाठपुरावा केला जात आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत विद्यार्थ्यांच्या सध्याच्या स्तरावरून वाढ करून त्यांना असर स्तरापर्यंत पोहोचविणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी धुळे तालुक्यातील वडणे येथील जिल्हा परिषद शाळेस ११ जानेवारी २०२३ रोजी भेट दिली होती. त्यावेळी तेथील प्रभारी मुख्याध्यापक मिलिंद चौधरी यांना अध्ययन प्रणालीबाबत विचारणा केली असता काहीच माहिती देता आली नाही.

हेही वाचा…मुंबईतील चर्चा निष्फळ; नाशिकमध्ये आंदोलन सुरूच राहणार

याबाबत चौधरी यांना शिक्षण विभागाच्यावतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीसाठी विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित केले आहे का, अध्ययनस्तर वाढीसाठी कोणकोणत्या उपाययोजना, उपक्रम राबविण्यात आले, याबाबत २० फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या दालनात सादरीकरणासाठी चौधरी यांना बोलविण्यात आले होते. मात्र चौधरी हे अनुपस्थित राहिले. त्यांची ही कृती असमाधानकारक आणि वरिष्ठांच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वरिष्ठांचा अवमान करणारी ठरवण्यात आली.

हेही वाचा…नाशिक: आदिवासी शेतकरी आंदोलनातील एकाचा मृत्यू; जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी दुर्लक्ष केल्याने चौधरी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांनी निलंबित केले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात असताना काही शिक्षक हलगर्जीपणा करीत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यापुढील काळात देखील जिल्हास्तरीय अधिकारी शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमाची पडताळणी करणार आहेत. त्यामध्ये कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास अशा शिक्षकांवर देखील कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.