जळगाव : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना, महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांकडून अजुनही युतीचे स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत भाजपने एरंडोल-पारोळ्यात नगर परिषद निवडणुकीसाठी अजित पवार गटाला डावलून शिंदे गटासोबत युती केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील १६ नगर परिषद आणि दोन नगर पंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सोमवारपासून सुरू झाली असली, तरी भाजपसह शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) अजुनही युतीवर एकमत झालेले नाही. तशात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षांशी म्हणजे शिंदे गटासह अजित पवार गटाशी हात मिळवणी करण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हादरलेल्या भाजपने जास्त वेळ न दवडता सर्वात आधी प्रस्ताव घेऊन आलेल्या पक्षाला जवळ करण्याचे धोरण राबविल्याचे दिसत आहे.

एरंडोल-पारोळ्यातही भाजपने तोच कित्ता गिरविला आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने कोणताच प्रतिसाद न दिल्याने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि शिंदे गटाने आपल्या युतीची थेट घोषणा करून टाकली. यावेळी भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार मंगेश चव्हाण, शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील आणि माजी आमदार चिमणराव पाटील उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. महायुतीतील घटक पक्षांमधील मतभेद आता उघडपणे समोर येत असून, तिन्ही पक्षांच्या समन्वयाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील हे भाजपसोबतचे संबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, त्यांच्या पक्षातील आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा करून राजकीय समीकरणांना मोठा धक्का दिला आहे.

आमदार पाटील यांच्या घोषणेमुळे महायुतीतील अंतर्गत ताणतणाव अधिक वाढले असून, आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरील आघाड्यांचे गणित कसे बदलणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. जिल्ह्याचे राजकारण आता अधिक चुरशीचे, तर काही प्रमाणात अनिश्चिततेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर, नगर परिषदांसह नगर पंचायतींवर बहुमताने सत्ता आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पाचोऱ्यात शिंदे गटाने आव्हान दिले असताना, त्याच पक्षाच्या आमदाराला बरोबर घेऊन एरंडोल-पारोळ्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने युतीची तयारी केली आहे. अर्थात, शिंदे गटाशी जुळवून घेताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोयीस्करपणे बाजुला ठेवण्याची भूमिका भाजपने घेतल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे. निवडणुकीत भाजपसह शिंदे गटाला कदाचित अजित पवार गटाशी दोन हात करण्याची वेळ त्यामुळे येऊ शकते, असे बोलले जात आहे.