जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात पद्मालय देवस्थान परिसरातील जंगलामध्ये अंदाजे ३० वर्षीय अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. महिलेचा खून करून जंगलात पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू, अशी नोंद करण्यात आली.

पद्मालयपासून नागदुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जंगलात काही गुराखी नेहमीप्रमाणे त्यांची जनावरे चारण्यासाठी गेली होती. पैकी एका गुराख्याला जंगल परिसरात अज्ञात महिलेचा कमरेपासून चेहऱ्यापर्यंत अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. मृतदेहाचे फक्त पाय दिसत होते. बाकी इतर भाग जळालेल्या अवस्थेत होता. त्याबद्दल गुराख्यांनी तत्काळ ग्रामस्थांना तसेच एरंडोल पोलीस ठाण्याला माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांचे श्वान आणि न्यायवैद्यक पथक दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून काही नमुने ताब्यात घेतले. सदर घटनेत ज्वलनशील पदार्थाचा वापर करून महिलेला जाळण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले.

अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, एरंडोल पोलीस ठाण्याचे निरीक्षक निलेश गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांना पुढील तपासाच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या.

महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल

दुसऱ्या घटनेत जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात पोटच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन २३ वर्षीय विवाहितेवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा पाचोरा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. संशयित बाळू काळू राठोड (रा. कुऱ्हाड तांडा, ता. पाचोरा) याने पीडितेच्या मुलीला तिच्यापासून हिरावून घेतले. आणि तुझ्या मुलीचे काहीतरी बरे वाईट करेन,अशी धमकी दिली. त्याच धाकाखाली त्याने पीडितेवर पाचोरा येथील एका हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले.

तेवढ्यावरच न थांबता संशयिताने पीडितेला जर तू माझ्यासोबत आली नाहीस, तर मी तुझी बदनामी करेन आणि तुझ्या मुलीला संपवून टाकेन, अशी धमकी दिली. त्या भीतीपोटी पीडितेला त्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील एका हॉटेलवर नेले. बाळू राठोड याने तिथेही पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. नेहमीच्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पिंपळगाव हरेश्र्वर ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून आरोपी बाळू राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश गणगे करत आहे.