जळगाव : ऐन हिवाळ्यात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील वाकोद गावात पाणीप्रश्नाने बिकट स्वरूप धारण केले आहे. सद्यःस्थितीत वाकोदकरांना १०-१२ दिवसांआड अर्थात महिनाभरात अवघे तीन दिवस पाणी मिळत असून, त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. टंचाईचा गैरफायदा घेत प्रतिजार २० रुपयांनी विक्री केला जात असून, त्यातून व्यावसायिकांकडून अशुद्ध पाणी दिले जात असल्याची तक्रार आहे. वाकोद गावात आतापासूनच १० टँकरभर पाण्याची विक्री केली जात आहे.
जामनेर तालुक्यातील वाकोदसह इतरही गावांत पाणीप्रश्न बिकट झाला आहे. अपुऱ्या पावसामुळे वाकोदमधील पाण्याचा प्रश्न अधिकच कठीण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावात १० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. गावातील जलवाहिनीच्या व्हॉल्व्हलाही गळती लागली आहे. व्हाॅल्व्हला लागलेल्या गळतीच्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. अनेकांनी परवानगी न घेताच जारच्या अशुद्ध पाण्याचा व्यवसाय थाटला आहे. हे जार २० रुपयांना विक्री केले जात आहेत.
हेही वाचा : भाजप मंत्र्याने मंचावरुन दिला ‘जय राष्ट्रवादी’चा नारा; नंतर केली सारवासारव
जारच्या पाणी विक्रीसाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी आवश्यक असते, तर केंद्र शासनाच्या वेट्स अँड मेजरमेंट कार्यालयाकडून किंमत निर्धारित केली जाते. मात्र, अनेकांनी या परवानग्यांना फाटा देत अनधिकृत जार आणि टँकरद्वारे पाण्याची विक्री सुरू केली आहे. कोणतीही तपासणी न झाल्याने हे पाणी मानवी आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे अनधिकृत व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
हेही वाचा : नाशिकची गडद दुष्काळाकडे वाटचाल; १३१ गावे, २३७ वाड्यांना टँकरने पाणी
जारबंद पाणी विक्रीसाठी शुद्ध जलशुद्धीकरण प्रकल्पाला (आरओ प्लान्ट) परवानगी घ्यावी लागते. त्यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते; परंतु ग्रामीण भागात परवानगी न घेताच पाणी विक्री करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. खासगी टँकरद्वारे २०० लिटर पाण्यासाठी ग्रामस्थांना ४० रुपये मोजावे लागत आहेत. वाकोदला आतापासूनच १० टँकर पाण्याची विक्री केली जात आहे.