जळगाव : जिल्ह्यातील रावेर पोलिसांनी सराईत दुचाकी चोरांच्या टोळीला गजाआड करून तब्बल १३ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ज्यामध्ये बुलेट, आर १५, सुझुकी बर्गमन यासारख्या नऊ महागड्या दुचाकींचा समावेश आहे.
रावेर पोलीस ठाण्यात २० डिसेंबर २०२५ रोजी रॉयल एनफिल्ड बुलेट चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. तक्रारदार हे जळगावहून रावेर येथे नातेवाईकांकडे आले असता, चौराहा भागात त्यांनी नवीन पांढऱ्या रंगाची बुलेट घरासमोर लावली होती. काही वेळाने अज्ञात चोरट्यांनी ती बुलेट चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान रावेर शहरातील तब्बल ९५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासण्यात आले. मात्र, संशयितांनी टोपी घालून चेहरा झाकल्याने ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. तपासात संशयितांची खास मोडस ऑपरेंडी समोर आली. ते काही अंतरापर्यंत चोरलेली दुचाकी लोटत घेऊन जात असत. काही अंतरावर जाऊन हॅन्डलचे कुलूप तोडून वाहन सुरू करत असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, अशाच प्रकारची चोरी भुसावळ येथे झाल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली. पुढील तपासात चोरीस गेलेली बुलेट शिरपूर येथे विकली गेल्याची खात्रीलायक माहिती पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार पथकाने तपासाची चक्रे फिरवत चोपडा परिसर गाठला. तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित चोपडा येथे असल्याचे समजताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला. मात्र, पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर त्यांना कोरपावली (ता. यावल) येथे ताब्यात घेण्यात आले. अटकेतील संशयितांमध्ये गौरव दत्तात्रय तायडे (२०), तौसिफ तय्यब (२०) आणि अब्दुल रहेमान पटेल (२०, तिन्ही रा. कोरपावली, ता. यावल, जि. जळगाव) यांचा समावेश आहे. पोलिसी खाक्या दाखवताच तिन्ही संशयितांनी दुचाकींच्या चोरीची कबुली दिली.
पोलीस चौकशीत त्यांनी आतापर्यंत एकूण महागड्या आणि नव्याने बाजारात झालेल्या नऊ दुचाकी चोरल्याचे समोर आले. ज्यामध्ये रॉयल एनफिल्ड बुलेट, आर-१५, बर्गमन यांसारख्या वाहनांचा समावेश आहे. चोरीच्या काही दुचाकी संशयितांच्या घरातून तसेच कोरपावली गावातून हस्तगत करण्यात आल्या, तर काही एकांत ठिकाणी लपवून ठेवल्या होत्या. त्या हस्तगत करताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. संशयित केटरिंगच्या कामाच्या निमित्ताने गुजरात राज्यातील वडोदरा व इतर शहरांत जात असत. तेथे रेकी करून पसंतीची मोटारसायकल चोरून महाराष्ट्रात आणून कोरपावली गावात विकत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच चोरीच्या दुचाकी विकल्यानंतर बनावट आर.सी. बुक तयार केल्या जात असल्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने पुढील सखोल तपास सुरू आहे.
तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी साथीदार अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक सुनील मोरे, गुन्हे शोध पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण, पोलीस नाईक कल्पेश आमोदकर, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, विशाल पाटील, सुकेश तडवी, विकार शेख, तथागत सपकाळे, रुबाब तडवी, गजानन बोने आदींनी विशेष परिश्रम घेतले. पुढील तपास कल्पेश आमोदकर करीत आहेत.

