नंदुरबार – स्वांतंत्र्यानंतरही गावात बस येत नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील एका गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गरज पूर्ण करण्यासाठी दररोज सुमारे आठ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. ही परिस्थिती शहादा तालुक्यातील एका गावातील आहे. बससेवा नसल्याने गावातील पालक पायी विद्यार्थिनींना पाठविण्यास तयार नसल्याने त्यांना या असुविधेचा सर्वाधिक फटका बसत आहे.

शहादा तालुक्यातील तिधोर हे गाव आजही मूलभूत सेवांपासून वंचीत आहे. या गावाला चारही बाजुने येणारे रस्ते निकृष्ठ दर्जाचे आणि वापरण्याजोगे नसल्याने या गावात बस येत नाही. स्वातंत्र्यानंतर २००८ मध्ये या गावापर्यंत १५ दिवस बससेवा सुरु झाली होती, असे गावातील वयोवृद्ध सांगतात. त्यांनतर आजतागायत या गावात बस आलेली नाही. बस नसल्याचा सर्वाधिक त्रास तिधोरे गावातील विद्यार्थ्यांना होत आहे. या गावात इयत्ता चौथीपर्यत शाळा असली तरी पाचवी ते आठवीच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेले गोगापूर गाव गाठावे लागते. म्हणजेच ये-जा करुन विद्यार्थ्यांना दररोज आठ किलोमीटर पायपीट करावी लागते. गोगापूर ते तिधोर दरम्यान असलेल्या खापरी नदीवर फरशीच नसल्याने बस य़ेवू शकत नाही. विशेष म्हणजे, पावसाळ्यात खापरी नदीला पूर आल्यानंतर तीन महिने विद्यार्थी शाळेला मुकतात.

दुसरीकडे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शहादा शहरातील महाविद्यालय गाठण्यासाठी तिधोरे गावातून दुसऱ्या बाजुला असणाऱ्या डामळदा फाट्यापर्यत अडीच किलोमीटरची पायपीट करावी लागते. त्यातच बस न मिळाल्यास होणारा त्रास निराळा. या रस्तावर केळीसह अन्य पिकांचे बाग असल्याने त्यात हिस्त्र प्राण्याचा वावर. अशातच महाविद्यालयांमधून येतांना बस आणि अन्य प्रवास करुन सहा ते सात वाजत असल्याने अंधारातून प्रवास करताना भीती मनात घेवूनच अडीच किलोमीटरची पायपीट करावी लागते. त्यामुळेच या गावातील विद्यार्थिनींना महाविद्यालयीन शिक्षणच बंद झाल्याचे वर्षा सुरेश सोनवणे या विद्यार्थिनीने सांगितले. आपल्यात शिक्षण्याची जिद्द आहे .त्यामुळे आपण महाविद्यालयीन शिक्षण घेत आहोत. मात्र शिक्षण सोडून घरात बसावे लागणाऱ्या आपल्या मैत्रिणीची व्यथा सांगताना तिचा व्यवस्थेच्या अनास्थेवरील राग स्पष्ट दिसतो.

तिधोरे गाव हे लोहारे ग्रामपंचायतीला जोडलेले आहे. या गावाची लोकसंख्या एक हजारांच्या आसपास. दुसरीकडे असलोद गावही या तिधोरेपासून तीन किलोमीटरवर, गोगापुर तीन ते चार किलोमीटर अंतरावर तर डामळदा गावही अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर. या आजबाजुच्या चारही गावांमध्ये बससेवा सुरु आहे. डामळदे रस्त्यावरील नाल्यावर यंत्रणेने मोठा फरशी पूल बनवला. परंतु, अडीच किलामीटरचा रस्ता बनविण्यात यंत्रणेला यश आले नाही. शासनाने शिक्षणाचा समान अधिकार तर दिला. मात्र त्यासाठी आवश्यक संसाधनांचा विचारच झाला नसल्याने शालेय मुलांसह महिलांना या रस्ते नसल्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे गावातील उच्चशिक्षीत तरुणी निकीता सोनवणे सांगते. या गावातील महिलांना आपल्या प्रत्येक कामासाठी पुरुषांवर अवलंबून राहून त्यांच्या दुचाकीवरुनच अथवा पायपीट करुन दुसरे गाव गाठावे लागते. हा त्यांच्या मूलभूत अधिकारांचे देखील हनन असल्याचे निकीता म्हणते.

गावात प्रत्येक निवडणूकीवेळी राजकारणी येतात. रस्त्याचे आश्वासन देतात. निवडणूका संपल्या की त्यांची आश्वासनेही हवेत जात असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावातील काही तरुण तर आपण महाविद्यालायत जातो तेव्हा देखील अशीच भयावह परिस्थिती होती. आणि आजही अशीच परिस्थिती असल्याने आता या पायपिटीचा त्रास आमच्या लेकरांच्या वाटेलाही येणार का, अशी भीती व्यक्त करीत आहेत. बस समस्येबाबत शहादा आगार प्रमुखांनी ग्रामपंचायत स्तरावरुन अजूनही बससेवेबाबत मागणीच आली नसल्याचा दावा केला.