नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने प्रसाद तसेच खाद्यपदार्थांच्या दुकांनावर छापा टाकून ५४ हजार ४४० रुपयांचा भेसळयुक्त माल ताब्यात घेतला. तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्दी असल्याने तसेच उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविक आणि पर्यटकांची गर्दी वाढली आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थांतून भाविक आणि पर्यटकांचे आरोग्य बिघडू नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरानजीक असलेल्या दुकानांमध्ये, प्रसाद भांडारात भेसळयुक्त मावासदृश्य स्पेशल बर्फी पासून पेढा आणि कलाकंद बर्फी तयार करुन विकण्यात येते. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात मे. भोलेनाथ स्विट्समधून ३७ हजार ४४० रुपयांचा ७८ किलो कुंदा, श्री नित्यानंद पेढा सेंटरमधून सहा हजार ६०० रुपयांचा २२ किलोचा माल जप्त करण्यात आला.

हेही वाचा…त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४ कुपोषित बालके, ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्याचे आदेश

भेसळयुक्त पेढे, कलाकंद बर्फी तयार करण्यासाठी वापरात येणारा मावासदृश्य अन्न पदार्थाचा साठा नाशवंत असल्याने त्र्यंबक नगरपरिषदेच्या घंटागाडीत टाकून कचरा डेपोत नष्ट करण्यात आला. यातील अन्न पदार्थाचे नमुने विश्लेषकास पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.