नाशिक – आगामी कुंभमेळ्यासाठी तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीसंदर्भात राजकीय, सामाजिक स्तरावर वेगवेगळे पडसाद उमटत असतांना सिने-नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी एकही झाडाला हात लावू देणार नाही, असे ठणकावल्यानंतर नाशिकच्या कलावंत अनिता दाते यांनी तपोवनातील वृक्षतोडीला विरोध दर्शवित आंदोलनाला पाठिंबा दिला. परंतु, अन्य कलावंत गप्प का, असा प्रश्न नाशिककरांकडून उपस्थित होत आहे.

आगामी कुंभमेळा हरित कुंभ व्हावा, यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न होत असतांना प्रशासन मात्र ढिम्म आहे. तपोवनात सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी नाशिककर, युवावर्ग अशा विविध घटकांकडून तपोवनातील वृक्षतोडीला विरोध दर्शविला जात आहे. ही वृक्षतोड थांबावी यासाठी नाशिककरांनी एकजूट दाखवित पर्यावरणप्रेमींना साद घातली. या सादेला प्रतिसाद देत सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी तपोवनास भेट देत तेथील आंदोलकांशी चर्चा केली.

झाडे आपले माय बाप आहेत. त्यांना आपण हात लावू द्यायचा नाही. आपली कोणाशी दुश्मनी नाही. झाडांमुळे झाली तर मला फरक पडत नाही. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांनी जनतेला उत्तर द्यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. राजकीय तसेच सामाजिक पटलावर याबाबत पडसाद उमटत असतांना कला क्षेत्रातून नाशिकमधील अभिनेत्री अनिता दाते यांनी तपोवन येथे आंदोलकांची भेट घेतली.

तपोवनात विविध प्रकारची वृक्षसंपदा आहे. कुंभमेळ्याला धार्मिक अधिष्ठान आहे. परंतु, त्यासाठी वृक्षतोड करावी, असे कोणी सांगितले, असा प्रश्न अनिता दाते यांनी उपस्थित केला. कुठल्याच साधुला ऐशोरामाची व्यवस्था व्हावी, असे वाटणार नाही. तपोवनात कुठलेही झाड, झुडूप काढले जाऊ नये. हरित कुंभ ही संकल्पना यामुळेच प्रत्यक्षात येणार आहे. अन्य कलावंतांची हीच भूमिका आहे. याठिकाणी प्रदर्शन केंद्र होणार आहे.

कलावंताला कला सादर करण्यासाठी प्रत्येक शहरात नाट्यगृह, चित्रपटगृह असावे. ते नसेल तर कला रस्त्यावर, झाडाखाली सादर करू. पण त्यासाठी झाडे तोडली जाऊ नयेत, ही आमची भूमिका असल्याचे दाते यांनी स्पष्ट केले. चिन्मय उदगीरकर यांनीही आपले म्हणणे मांडले. तपोवन म्हणजे नाशिक नाही. गोदा उगमपासून सगळाच परिसर नाशिक आहे. आपण तपोवनामध्ये राहतो. गोदावरी जेवढी प्रदुषणमुक्त राहील, तेवढे तपोवन समृध्द राहील. वृक्षतोड करून शहराचा विकास होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

बासरीवादक मोहन उपासनी, दिग्दर्शक सुहास भोसले आदी मंडळीही वृक्षतोडीविरोधात आहेत. नाशिकमधील ज्येष्ठ कलावंत दीपक करंजीकर, विद्या करंजीकर, अभिजीत खांडकेकर यासह मालिकांमध्ये काम करणारे नाशिकच्या मुशीतील इतर कलावंत मात्र गप्प आहेत. नाशिक शहर परिसरातील लोककलावंत हे सध्या तपोवनात एकत्र येत शाहिरी, पोवाडे गात तपोवनातील वृक्षतोडीविरोधात प्रबोधन करीत आहेत. यासाठी काव्य संमेलन, गाण्यांची मैफल आदींचे नियोजन सुरू आहे.