नाशिक – कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातील वाहतुकीचा केंद्रबिंदू असणाऱ्या द्वारका चौकात भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्यामुळे वाहतुकीत झालेल्या बदलामुळे राज्य परिवहन महामंडळाने जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगरसह गुजरातला जाणाऱ्या बसेस निमाणी स्थानकातून सोडण्यास सुरुवात केली आहे. मेळा, नवीन (ठक्कर बाजार) आणि महामार्ग बस स्थानकातून राज्यातील काही निवडक भागात बसेस सोडण्यात येणार आहे. या बदलामुळे पहिल्या दिवशी प्रवाशांमध्ये गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले.

चार प्रमुख रस्ते व सात उपरस्ते एकत्र येणाऱ्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी यारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. या परिसरात अवजड वाहने, खासगी प्रवासी बस, एसटी, सिटीलिंक बसेसला पुढील तीन महिने प्रवेश बंद केला गेला आहे. यामुळे मनपाच्या सिटीलिंकच्या बस वाहतूक मार्गात मोठे फेरबदल झाले. द्वारका चौक वाहतुकीस बंद असल्याने एसटी महामंडळाला मध्यवर्ती भागातील स्थानकांऐवजी पंचवटीतील निमाणी स्थानकातून बसेस सोडण्याचे नियोजन करावे लागले. निमाणी बसस्थानकाचा वापर मनपाच्या सिटीलिंक बससेवेसाठी केला जात होता. पोलिसांच्या सूचनेनुसार सिटीलिंकने निमाणी येथून सुटणाऱ्या आपल्या बसेस तपोवन बस डेपोतून सोडण्यास सुरुवात केली. निमाणी स्थानकाचा वापर आता एसटी महामंडळाकडून सुरू झाला आहे.

रविवारपासून महामंडळाने निमाणी बस स्थानकातून सूरत, वापी, बलसाड, इंदूर या परराज्यातील बस फेऱ्यांसह जळगाव, चोपडा, धुळे, नंदुरबार, शिरपूर, साक्री नवापूर, सटाणा, शहरादा, धुळे व जळगाव मार्गावरील सर्व बस, मालेगाव, मनमाड, नांदगावला जाणाऱ्या बसच्या फेऱ्या सोडण्यास सुरुवात केली. या शिवाय, येवला, लासलगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, जिंतूर, बुलढाणा, लोणार या ठिकाणी आणि या मार्गे पुढे जाणाऱ्या सर्व बसच्या फेऱ्या निमाणी स्थानकातून सोडल्या जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी दिली. रविवारपासून लागू झालेले हे बदल पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे. पहिल्या दिवशी या बदलांची कल्पना नसल्याने प्रवासी वर्गात गोंधळ उडाला. मध्यवर्ती बस स्थानकांवर आलेल्यांना रिक्षा वा बसने पंचवटीतील निमाणी स्थानक गाठावे लागले.

मुंबई, पुणे, शिर्डीचे काय..?

सद्यस्थितीत मेळा स्थानकातून पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारासह या मार्गावरील व पुढे जाणाऱ्या सर्व बसच्या फेऱ्या सुटतील. नवीन बसस्थानक अर्थात ठक्कर बजार स्थानकातून त्र्यंबकेश्वर, सिन्नर व इगतपुरी, गिरणारे, हरसूल ओझरखेड मार्गावरील ग्रामीण फेऱ्या सोडल्या जातील. महामार्ग स्थानकातून शिर्डी, मुंबई मार्गावरील सर्व फेऱ्या आणि अहिल्यानगर मार्गावरील सर्व फेऱ्या सुटणार आहेत.