नाशिक : महानगरपालिकेचे तत्कालीन मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांनी आपल्या कार्यकाळात एक कोटी, ३१ लाख ४२ हजार ८६९ इतकी अपसंपदा गोळा केली. याविरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाजन हे महानगर पालिकेत कार्यरत असतांना २२ ऑक्टोबर १९८६ ते ३१ मे २०१८ या सेवा कालावधीत कायदेशीर उत्पन्नापेक्षा ४२ टक्के इतकी अपसंपदा जमा केल्याचे उघड झाले. ही अपसंपदा जमा करण्यासाठी पत्नी निशा महाजन यांनी त्यांना प्रोत्साहन दिले म्हणून दोघांविरूध्द मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : अजित पवार यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन

महापालिकेचे अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांचा कार्यकाळ हा वादग्रस्त राहिला आहे. त्यांनी रुग्णालयांना देण्यात येणाऱ्या परवान्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाची अडवणूक केली, नगरसेवकांकडून वेळोवेळी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांसाठी आडकाठी केली. याशिवाय महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या खरेदीमध्येही त्यांनी घोटाळा केल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारींचा अभ्यास करत असतांना अपसंपदा मिळवल्याची अनेक प्रकरणे पुढे आली. कायदेशीर उत्पन्नापेक्षा जादा अपसंपदा गोळा केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी महाजन आणि त्यांची पत्नी निशा महाजन यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील काही दिवसात वादग्रस्त प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे तपास अधिकारी स्वप्नील राजपूर यांनी म्हटले आहे.