नाशिक : दिंडोरी लोकसभेची जागा महाविकास आघाडीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला द्यावी अन्यथा पक्षाच्या चिन्हावर उमेदवार देण्याचा पवित्रा जाहीर करुन माकपने आपली भूमिका बदलली आहे. याआधी माकपचे इच्छुक उमेदवार जिवा पांडू गावित यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचे मान्य केले होते. अर्ज भरण्याची घटिका जवळ येत असताना माकपने जाहीर सभेतून शक्ती प्रदर्शन करीत महाविकास आघाडीची कोंडी केली आहे.

माकपने दिंडोरी येथे शेतकरी, कामगार, शेतमजुरांच्या जाहीर सभेतून शक्ती प्रदर्शन करीत या जागेवर नव्याने हक्क सांगितला आहे. या जागेवर महायुतीच्या उमेदवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार, महाविकास आघाडीचे भास्कर भगरे आणि वंचितकडून महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे हे मैदानात आहेत. उमेदवार जाहीर करण्यापूर्वी शरद पवार यांनी नाशिक दौऱ्यात माकपचे माजी आमदार, इच्छुक जिवा पांडू गावित यांच्याशी चर्चा केली होती. माकपने लोकसभेत मदत करावी, विधानसभेत त्यांची परतफेड करण्याची भूमिका पवार यांनी मांडली होती. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केल्यानंतर खुद्द गावित यांनी माकप निवडणूक लढविणार नसल्याचे म्हटले होते. माकप महाविकास आघाडीला मदत करणार होते. परंतु, विशाल सभेतून माकपने या जागेवर दावा करीत मैदानात उतरण्याचा इशारा दिला आहे. माकपचे राज्य सचिव उदय नारकर यांनी माकपला जागा न सोडल्यास पक्षाच्या चिन्हावर उमेदवार देण्याचे जाहीर केले.

हेही वाचा : नाशिकमध्ये वंचितकडून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मैदानात, औपचारिक घोषणा बाकी

दिंडोरीच्या जागेसाठी माकप आधीपासून आग्रही होते. यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेऊन वेळोवेळी दावा केला होता. परंतु, अचानक राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोरीत उमेदवाराची घोषणा केली. राष्ट्रवादीची ही कृती महाविकास आघाडीच्या एकजुटीला व सहकारी पक्षांच्या विश्वासाला धक्का देणारी होती. या संदर्भात व्यवस्थित चर्चा होणे अपेक्षित होते. आमचा दावा लक्षात न घेता राष्ट्रवादी काँग्रेसची कृती मान्य नसल्याचा पवित्रा माकपने स्वीकारला आहे. हजारो आदिवासी शेतकऱ्यांना घेऊन नाशिक- मुंबई पायी मोर्चा काढणारे माजी आमदार जिवा पांडू गावित हे विधानसभा निवडणुकीत आजवर सातवेळा निवडून आले. आदिवासींच्या प्रश्नांवर त्यांचा सातत्याने संघर्ष सुरू आहे. मतदार संघात माकपची सव्वा लाखाच्या आसपास मते आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाची नाममात्र शक्ती आहे. त्यांचे चार आमदार अजित पवार गटात गेले. भाजपचा पराभव राष्ट्रवादीचा उमेदवार करू शकत नाही. त्यामुळे ही जागा माकपसाठी सोडायला हवी, असे माकपचे राज्य सचिव मंडळाचे सदस्य डॉ. डी. एल. कराड यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अजून वेळ आहे. दिंडोरी लोकसभेची जागा माकपला देण्याचा सकारात्मक निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घ्यावा. अशी आग्रही मागणी सभेतून करण्यात आली.