Ajit Pawar Apologizes Onion Farmers: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाने लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी महायुतीला झटका दिला. या निर्णयाने शेतकऱ्यांना झालेल्या त्रासाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर माफी मागितली. कांदा निर्यातीवर बंदी घालण्याची चूक झाल्याचे मान्य करतो. कुठल्याही परिस्थितीत कांदा निर्यातबंदी करायची नाही, हे केंद्र सरकारला सांगण्यात आल्याचा दावा पवार यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली जनसन्मान यात्रा शुक्रवारी निफाड आणि येवला विधानसभा मतदारसंघात पोहोचली. कांदा उत्पादक भागात शेतकऱ्यांशी संवाद साधताना पवार यांनी निर्यात बंदीवर भाष्य केले. उत्पादकांच्या नाराजीचा फटका दिंडोरीसह राज्यातील अनेक मतदारसंघात बसला. निर्यातबंदीने स्थानिक बाजारात भाव पडले. शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. याची जाणीव राज्य सरकारला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये या विषयावर एकमत झाले असून भविष्यात अशा कठोर उपायांचा अवलंब केला जाऊ नये, असे केंद्राला सांगण्यात आल्याचे पवार यांनी नमूद केले. अबकी बार ४०० पार घोषणेमुळे अनेक घटकांमध्ये अस्वस्थता पसरली. संविधान बदलणार, आरक्षण काढणार या प्रचाराचाही महायुतीला झटका बसला. यातून आम्ही बोध घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज माफी व कुठल्याही स्थितीत कांदा निर्यातबंदी न करण्याचे निश्चित झाले. नाशिक-मुंबई महामार्गाविषयी स्थानिक आमदार वारंवार तक्रार करीत होते. या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हा रस्ता दुरुस्त होईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: जळगावमध्ये कामगार निरीक्षकाला लाच घेताना अटक

पश्चिमी वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणले जाणार आहे. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत त्यासंबंधीच्या नार-पार योजनांना मान्यता दिली जाणार आहे. हे पाणी वळविल्याशिवाय गोदावरी खोऱ्यातील धरणे भरू शकत नाहीत. नाशिक शहरासाठी किकवी प्रकल्पाला मंजुरी दिली जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनीही महायुती सरकारने विविध घटकांसाठी मांडलेल्या योजना अवितरपणे सुरू राहणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा: नाशिक महापालिकेच्या संशयास्पद भूसंपादनाच्या चौकशीचे आदेश, भाजप आमदाराकडून तक्रार

योजनांसाठी आमच्या माणसांसमोरील बटण दाबा

महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली. महाराष्ट्र देशातील प्रगत राष्ट्र आहे. राज्याचे स्थूल उत्पन्न चांगले आहे. सर्व अभ्यास करून आम्ही ही योजना सुरू केली. विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका. आम्हाला दीर्घकालीन राजकारण करायचे आहे. या योजना कायमस्वरुपी चालू ठेवण्यासाठी तुम्ही आम्हाला सत्तेत पाठवले पाहिजे. आमच्या माणसांसमोरील बटन दाबले पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.