नाशिक : धर्माच्या नावाखाली समाजासमाजात विखारी व्देष पसरविण्याचे काम काही घटकांकडून केले जात असताना जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पुरणगाव येथे एका मुस्लिम व्यक्तीच्या घरी गणेशोत्सवात धार्मिक एकात्मतेचे दर्शन होत आहे. रहिम (मुन्ना) शेख यांनी आपल्या घरी गणेशाची स्थापना केली असून हे गणेश स्थापनेचे हे त्यांचे पाचवे वर्षे आहे. मनापासून श्रध्दा ठेवल्यास धर्म कोणताही असो, देव एकच असतो, हाच संदेश मुन्ना शेख हे आपल्या कृतीतून देत आहेत. मुन्ना यांची गणेशावर श्रध्दा जडण्यामागे एक निमित्त ठरले. त्यांना पहिल्या दोन मुली होत्या. मुलगा व्हावा म्हणून त्यांनी गावातीलच गणेश मंदिरात नवस केला. त्यानंतर त्यांना मुलगा झाला. त्यामुळे गणेशावर त्यांची श्रद्धा जडली. ते घरात भक्तीभावाने गणपतीची पूजा करतात. सर्वधर्म समभावचा संदेशही ते यानिमित्ताने देत आहेत. हेही वाचा. नाशिक : विसर्जन मिरवणूक वेळेत सुरु करण्याची सूचना; पोलीस-गणेशोत्सव मंडळ बैठक हेही वाचा. नाशिक : इगतपुरीजवळील अपघातात दोन जणांचा मृ़त्यू गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुन्ना यांच्या घरी भेट देत गणेशाचे पूजन केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून मुन्ना शेख यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जोपासली असून त्यांच्या कुटुंबाचे हे सामाजिक ऐक्याचे काम अतिशय कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले. यापुढील काळातही त्यांचे हे काम सुरू राहिल, अशी अपेक्षाही भुजबळ यांनी व्यक्त केली.