नाशिक – त्र्यंबकेश्वर तसेच इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांमधील रस्ते खराब झाले आहेत. याबाबत एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने अनेकदा पाठपुरावा करुनही प्रशासकीय पातळीवर कोणतीच कार्यवाही झाली नाही. या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी करत प्रशासनाचा निषेध करण्यासाठी संघटनेच्या वतीने मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. नागरिकांनी तीन तास रास्तारोको केले.
एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनी रस्त्यांची दुरूस्ती करावी, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी बांधकाम विभागाने आश्वासन दिले होते. त्यास वर्षापेक्षा अधिक काळ लोटूनही अद्याप सदर रस्त्याची दुरूस्ती झालेली नाही. झारवड ते जोशी कंपनी या रस्त्याची दुरूस्ती करावी, यासाठी रास्ता रोको आंदोलन करत खड्ड्यात वृक्षारोपण केले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी त्यावेळी देखील आश्वासन दिले होते. अद्यापही सदर रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही.
त्र्यंबक-देवगाव-श्रीघाट आणि वैतरणा धरण ते जोशी कंपनी या रस्त्यांची चाळण झाली असून अनेक अपघात होत आहेत प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे रस्त्याची दुरूस्ती करावी, यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने अनेकदा पत्रव्यवहार केले. आंदोलने केली. परंतु, अद्यापही रस्त्याची दुरूस्ती झालेली नाही.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्षवाडी, कळमुस्ते, आळवंडी धरण, जोशी कंपनी ते झारवड बुद्रुक या रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही . या सर्व रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवावेत, याबाबत अनेकदा तक्रार करून देखील काहीही झालेले नाही. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग जणू मृतावस्थेत असल्याचा दावा करुन बांधकाम विभागाची प्रेतयात्रा एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने देवगाव फाटा ते श्रीघाट अशी तीन किलोमीटर काढण्यात आली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तीन तास रास्ता रोको सुरू असतांना बांधकाम विभागाच्या वतीने तात्काळ दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली.
