लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
धनगर यांना ५० हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्यांच्या घराच्या तपासणीत ८५ लाख रुपये रोख, ३२ तोळे सोन्याचे दागिने, सदनिका तसेच मोकळ्या भूखंडाचे कागदपत्रे आढळले. त्यांच्या बँक खात्याचीही तपासणी करण्यात आली. स्टेट बँक ऑफ इंडियामधील चार वेगवेगळ्या खात्यात ३० लाख, १६ हजार ६२० रुपये आढळले.
हेही वाचा… धुळ्यात प्रार्थनास्थळाची विटंबना; पोलिसांचे शांततेचे आवाहन
दरम्यान, धनगर यांच्या कार्यपध्दतीचे किस्से आता शिक्षकांकडून बाहेर पडू लागले आहेत. धनगर यांची काम करण्याची पध्दत विचित्र होती. त्या कायम कर्मचाऱ्यांशी उर्मट वागत. स्वत:कडून चुका झाल्या की त्या कर्मचाऱ्यांवर ढकलत असत. कोणी एखाद्याचे काम बरोबर नाही, अशी तक्रार केल्यास त्या लेखी देण्यास सांगत असत. तक्रार प्राप्त झाली की समोरच्या व्यक्तीवर दबाव आणून त्याच्याकडून पैसे उकळायचे, ही धनगर यांची कार्यशैली राहिली आहे. त्यांच्यावरील कारवाईचे त्यामुळेच सर्व शिक्षकांकडून स्वागत होत आहे.