नाशिक: शेती उद्योग तोट्याचा असल्याने आम्ही कर्जबाजारी झालो. जिल्हा बँकेची सक्तीची वसुली आणि शेतजमिनी जप्तीची कारवाई विरोधात स्वातंत्र्यदिनी ५५ हजार शेतकरी नादारीची घोषणा करणार असल्याचे शेतकरी समन्वय समितीने म्हटले आहे. नाशिक जिल्हा बँकेचे हे शेतकरी थकबाकीदार आहेत. समितीच्या माहितीनुसार ५५ हजार ५९६ शेतकऱ्यांकडे जिल्हा बँकेची ९५१ कोटी ९९ लाखाची थकबाकी आहे. बँकेने सुमारे १५ हजार शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त केल्या असून ८३४ शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव करण्यात आले. कर्जदार सदरी २२५ शेतकऱ्यांची नावे लावण्यात आली. ३३३ शेतकऱ्यांचे नाव लावण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्तीची कर्ज वसुली बंद करावी आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा, खाते उतारा कोरा करावा, या मागणीसाठी समिती कित्येक दिवसांपासून आंदोलन करत आहे. बँकेने शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित मालकी हक्काच्या जमिनी प्रमाणपत्राच्या आधारे विकास सोसायटीच्या नावे करण्याचे कटकारस्थान रचल्याचा आरोप समितीकडून होत आहे. देशाची अर्थव्यवस्था शेती उद्योगावर अवलंबून आहे. केंद्र सरकारच्या विरोधी धोरणामुळे शेती व्यवसाय तोट्यात गेल्याने कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत आहेत. नाशिक जिल्हा बँकेच्या कारवाई विरोधात स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील ५५ हजार शेतकरी आम्ही नादार झालो, ही घोषणा करणार असल्याचे समिती अध्यक्ष भगवान बोराडे यांनी सांगितले. हेही वाचा : Jayakwadi Dam: जायकवाडीसाठी नाशिकमधून आतापर्यंत १७ टीएमसी पाणी, धरणांतील विसर्ग मंदावला एखादी कंपनी दिवाळखोरीत निघाल्यावर तिचे दिवाळे निघाले म्हणून दिवाळखोरी जाहीर केली जाते. तसेच आमच्या शेती व्यवसायाचे दिवाळे निघाल्याने शेतकरी स्वातंत्र्यदिनी नादारी घोषित करतील. हजारो शेतकरी गावोगावी, गावाच्या वेशीजवळ किंवा चावडीवर येऊन ही घोषणा करतील, याच दिवशी धरणे आंदोलन स्थळावर आम्ही कर्जमुक्त झालो, अशी नादारीची घोषणा करणार आहोत, असेही बोराडे यांनी म्हटले आहे. यावेळी अनंत पाटील, भाऊसाहेब हरक, सुरेश गाडे, शामराव निफाडे, हेमंत भांबारे आदी शेतकरी उपस्थित होते.