नाशिक – भारत हा युवा देश आहे. मात्र आपल्याकडे युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढती आहे. आपण शिक्षण घेऊन सुसंस्कृत झालेलो नाही. विद्यार्थी व्यसनमुक्त होणे गरजेचे आहे. हे मला सांगण्याचा अधिकार आहे. मला चहाचे व्यसन नाही, मी व्यायाम करतो असे सांगत त्यांनी आपल्याला संकटमोचक का म्हणतात याचे विश्लेषण कुंभमेळा तसेच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी केले.
येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे हीरक महोत्सवी प्रदेश अधिवेशन तीन ते पाच जानेवारी या कालावधीत येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित करण्यात आले. अधिवेशनात संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील परिषद रचनेतील २३ म्हणजेच शासकीय सात जिल्ह्यांमधून एक हजारपेक्षा अधिक कार्यकर्ते सहभागी झालेत. शनिवारी प. पू. स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
या वेळी बोलतांना महाजन यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना महाजन म्हणाले, आपल्याकडे बेरोजगारीचा प्रश्न वाढला आहे. सामाजिक समरसता हा मुद्दा आहे. याशिवाय वृध्दाश्रमाची संख्या वाढत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे का. घरात वयस्कर आई वडिल चालत नाही. हे आपले संस्कार आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत आपण शिक्षण घेऊन सुशिक्षीत झालो सुसंस्कृत नाही. भारत युवा देश होत आहे. मात्र वाढलेली व्यसनाधिनता चिंताजनक आहे. यामध्ये तरूणांचे प्रमाण लक्षणीय असतांना अशी तरूणाई काय कामाची? असेही महाजन म्हणाले. तुलनेत इस्त्राईल लोकसंख्या कमी पण युवकांमध्ये असणारे राष्ट्रप्रेम पाहता त्यांच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहु शकत नाही.
मी अभाविपच्या मुशीत घडलो आहे. नेतृत्वगुण, बेधडकपणे संकटाला भिडता.े केरळ येथील नैसर्गिक आपत्तीच्या वेळी येथुन १०० डॉक्टरांचे पथक पाच ते सहा ट्रक आैषधे घेऊन मी तिथे मदतकार्यात सहभाग घेतला. पहेलगाम हल्लाच्या वेळी दुसऱ्या दिवशी मदतीसाठी हजर होतो. उत्तराखंड येथेही मदत कार्यात होतो. खोपोली येथे डोंगराच्या कडा कोसळल्याने १५०जण अडकले. त्या ठिकाणी रात्री पोहचुन मदत कार्यात पोहचलो. रात्री डोंगर चढाई करत पहाटे पाच नंतर मदत कार्यात सुरूवात केली. याशिवाय राज्यात मनोज जरांगे, आदिवासी, शिक्षक प्रश्न कुठलाही असो मी थेट भिडतो. संघर्ष, संकटाला घाबरून चालत नाही म्हणुन मला संकटमोचक म्हणतात असे महाजन यांनी नमूद केले. या वेळी अभाविपचे पदाधिकारी उपस्थित होते.
