BJP Vs AAP In Nashik : नाशिक महापालिका निवडणूक प्रचार संपण्यास आता अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराला जोर दिला आहे. आम आदमी पक्ष नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक पहिल्यांदाच लढवित असून एकूण २८ उमेदवार पक्षाने उभे केले आहेत. आपने कोणत्याही पक्षाशी युती केलेली नाही. सोमवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता आम आदमी पक्षाच्या सर्व उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी तसेच कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून नाशिकच्या विकासाची दिशा ठरविण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री सरदार भगवंत मान आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे नाशिक शहरात पवन नगर येथे पाण्याची टाकी येथील मैदानात जाहीर सभा घेणार असल्याची माहिती आप नाशिक मनपा निवडणूक प्रचार समितीचे सचिव स्वप्नील घिया यांच्याकडून देण्यात आली होती.
सभेप्रसंगी संघटनमंत्री नवीन्दर सिंग अहलुवालिया, राज्य सहसचिव ॲड. प्रभाकर वायचळे, नाशिक शहराध्यक्ष अमोल लांडगे, स्टार प्रचारक ॲड. अभिजीत गोसावी, प्रचार समितीचे कार्याध्यक्ष योगेश कापसे, महिला शहराध्यक्ष श्वेतांबरी आहेर, युवा शहराध्यक्ष अमर गांगुर्डे, कायदेशीर सल्लागार ॲड.भूषण टाटिया , मालेगाव प्रभारी अल्ताफ शेख, माजी शहराध्यक्ष ॲड बंडूनाना डांगे व गिरीश उगले पाटील हे उपस्थित राहणार होते.
या जाहीर प्रचार सभेत पंजाबचे मुख्यमंत्री सरदार भगवंत मान महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभारावर ताशेरे ओढणार असून राज्य शासनाचे अद्याप उघडकीय न आलेले घोटाळे नाशिकमध्ये उघडकीस आणणार असल्याची माहितीही घिया यांच्याकडून देण्यात आली होती. या जाहीर सभेमुळे आप निवडणुकीचे नाशिकमधील वातावरण फिरवेल, असा विश्वास घिया यांना होता. नाशिकच्या गोदाघाट येथील पंजाब सरकारच्या मालकीच्या प्राचीन कपूरथळा धर्मशाळेची भगवंत मान पाहणी करणार होते. नाशिकमधील आपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून भगवंत मान आणि मनीष सिसोदिया यांच्या प्रचार सभेची जय्यत तयारी करण्यात येत असतानाच रविवारी रात्री साडेदहा वाजता त्यांना आप पक्षाला जाहीर सभेसाठी मैदानाची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे भगवंत मान आणि मनीष सिसोदिया यांचा दौरा रद्द करणे भाग पडल्याचे आप पक्षाचे नाशिक मनपा निवडणूक प्रचार समितीचे सचिव स्वप्निल घिया यांनी सांगितले.
पवन नगर येथे पाण्याची टाकी येथील मैदानात ही सभा होणार होती. आचारसंहिता लागू झाल्याच्या दिवशीच या मैदानाची नोंदणी आम्ही सभेसाठी केली होती. परंतु, अचानक कोणाच्यातरी दबावामुळे परवानगी नाकारण्यात आल्याचे स्वप्निल घिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, या मैदानावर आता भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची सभा होणार आहे. सुधाकर बडगुजर यांनी या सभेचे आयोजन केले असल्याची माहिती भाजपचे शहरप्रमुख सुनील केदार यांनी दिली.
