नाशिक : दिंडोरी लोकसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी माघार घेणाऱ्या माकपसाठी महाविकास आघाडीने कळवण विधानसभा मतदारसंघ सोडला आहे. या मतदारसंघात माकपच्यावतीने जे. पी. गावित हे बुधवारी शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादीचे (अजित पवार) नितीन पवार आणि माकपचे गावित यांच्यात सामना रंगणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली तरी महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा घोळ मिटलेला नाही. आघाडीतील घटकपक्ष असणाऱ्या माकपला लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने (शरद पवार) कळवण आणि डहाणू विधानसभेची जागा देण्याचे मान्य केले होते. दिंडोरी लोकसभा निवडणुकीत माकपच्या जिवा पांडू गावित यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. शरद पवार यांनी माकपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून तडजोड घडवून आणली. परंतु, गावित यांनी निवडणूक लढण्याचा हट्ट कायम ठेवला. त्यामुळे शरद पवार गटाचे अन्य वरिष्ठ नेते आणि गावित यांच्यात काहिसे बिनसले होते. तेव्हा आरोप-प्रत्यारोपही झाले. अखेरच्या क्षणी गावित यांनी माघार घेऊन भास्कर भगरेंचा मार्ग प्रशस्त केला. तेव्हाच शरद पवार यांच्याकडून कळवण विधानसभा मतदारसंघ माकपला सोडण्याचा शब्द घेतला गेला होता. त्यानुसार हा मतदारसंघ शरद पवार गटाने माकपला दिला आहे. माकपने नाशिक पश्चिमचा आग्रह धरला होता. परंतु, महाविकास आघाडीतील स्पर्धेत अन्य जागा मिळण्याची शक्यता मावळली आहे.
हेही वाचा…अजित पवार गटाकडून आमदारांना संधी, चार जणांना एबी अर्ज, तिघे बाकी
कळवण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने (अजित पवार) आ. नितीन पवार यांना पुन्हा मैदानात उतरविले आहे. मागील निवडणुकीत गावित यांचा अवघ्या साडेसहा हजार मतांनी पराभव झाला होता.
हेही वाचा…उमेदवारीसाठी धावाधाव, सर्वपक्षीय मातब्बरांचे मुंबईत ठाण
चुरशीची कशी ठरणार…
राष्ट्रवादी आणि शिवसेना दुभंगल्याने स्थानिक पातळीवरील राजकारण बदलले. लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना शरद पवार गटाच्या नवख्या शिक्षक उमेदवाराकडून पराभूत व्हावे लागले होते. लोकसभा निवडणुकीत कळवण मतदारसंघात महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा दुप्पट मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे माकप-राष्ट्रवादी अजित पवार गटातील थेट लढत झाल्यास ती चांगलीच चुरशीची ठरणार आहे