नाशिक : लग्नाचे आमिष दाखवत संशयित टोळीने एकाची एक लाख तीन हजार रुपयांना फसवणूक केली. या प्रकरणी सुरगाणा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदवड येथील एका युवकास सुनील चौधरी, कृष्णा गावित, जगन चौधरी यासह अन्य काही लोकांनी विश्वासात घेत लग्नासाठी मुलगी दाखवतो, असे आमिष दाखविले. यासाठी आभासी पध्दतीने त्याच्याकडून ३२,५०० रुपये आणि ७०,५०० रुपये असे एकूण एक लाख तीन हजार रुपये घेतले.
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात मुसळधार; अनेक नदी, नाल्यांना पूर, घरांची पडझड
मुलीचे नातेवाईक असल्याचे भासवत मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला. मुलीच्या हातात काही पैसे देण्यात आले. यावेळी दोन लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर वेळोवेळी पैसे घेऊन संबंधित युवकाची फसवणूक करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सुरगाणा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.