नाशिक – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव ग्रामपंचायत अंतर्गत बर्ड्याची वाडी म्हणून आदिवासी पाडा आहे. या पाड्यात राहणाऱ्या ४८ वर्षाच्या महिलेने आतापर्यंत तीन अपत्यांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाला जाग आली. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती स्थापन केली आहे. विकलेले बालक तसेच त्यांच्या कथित पालकांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे.

बर्ड्याची वाडीत बच्चीबाई विष्णू हाडोंगे (४८) या कुटूंबासह राहतात. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. गरीबीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी त्यांना मार्ग सापडला. आपले बाळ विकण्याचा. त्यांनी आतापर्यंत आपल्या तीन अपत्यांची विक्री केली आहे. परिसरातील नागरिकांसह प्रशासनही याविषयी अनभिज्ञ होते. त्यांच्या तीन मुलींची लग्न झाली आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा दिवस गेले. आशा आणि अंगणवाडी सेविका यांनी बाळंतपणासाठी त्यांचे नाव सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी जाण्यास त्यांनी नकार दिला.

अखेर चार ऑक्टोबर रोजी त्यांची प्रसूती झाली. या कालावधीत त्यांनी कोणत्याही प्रकारची तपासणी केली नाही. प्रसूतीसाठी त्यांना जबरदस्तीने दवाखान्यात नेण्यात आले. दोन महिन्यांनी आरोग्य कर्मचारी बाळाचे वजन घेण्यासाठी तिच्या घरी गेले असता बाळ घरी आढळून आले नाही. बच्चीबाई यांना बाळाविषयी विचारणा केली असता त्यांनी बाळाला मोठे करण्याची आर्थिक कुवत नसल्याने बाळ विकल्याचे सांगितले. हा प्रकार उघड झाल्यानंतर आरोग्य विभाग, पोलीस यासह सर्व यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. मंगळवारी सायंकाळी या प्रकाराविषयी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हांडोगे तसेच त्यांनी आतापर्यंत ज्यांना बाळ विकले आहेत, त्यांच्या ताब्यातून बालकांना घेण्यास सुरूवात केली आहे.

घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे यांनी याविषयी माहिती दिली. आम्ही बाळ आणि त्यांच्या पालकांना ताब्यात घेतले आहे. बालकांना जवळच्या नातेवाईकांना दत्तक देण्यात आले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या सर्व प्रकाराचा सखोल तपास बाल कल्याण समिती करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी महिला व बाल विकास विभाग, बाल कल्याण समिती आणि अन्य पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन केली असून यासंदर्भात वस्तुनिष्ठ अहवाल मागविण्यात आला आहे.