नाशिक: दिंडोरी रस्त्यावरील पाटालगतच्या वज्रेश्वरी परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत पसरविणाऱ्या फरार संशयितांना ताब्यात घेण्यात पंचवटी पोलिसांना यश आले. यात एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. संशयितांची त्याच भागात पोलिसांनी वरात काढली. वज्रेश्वरी भागात २१ मे रोजी पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली होती. तक्रारदार सागर फुलमाळी हे रिक्षात बसलेले होते. लामखेडे मळ्याकडून मोटारीतून आलेल्या पाच ते सहा जणांनी दांडके, कोयते घेऊन त्यांच्या रिक्षासह आसपासच्या मोटार, टेम्पो, रिक्षा आणि दुचाकीची मोडतोड केली. वाहनांच्या काचा फोडल्या. रिक्षाच्या हुडवर कोयता, दांडक्याने वार केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव यांनी हा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते.
हेही वाचा : नाशिक: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांना २० वर्ष कारावास
पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अमलदारांनी संशयित गौरव थोरात (१९) आणि प्रतीक दोबाडे (२१) यांना अटक केली. हे संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तपासात फरार साथीदारांची माहिती मिळविण्यात आली. त्याआधारे नीतेश राऊत (२४, अपेक्षा सोसायटी, आरटीओ कॉर्नर), चेतन गायकवाड (१८, अश्वमेधनगर, पेठरोड) यांना अटक करण्यात आली. तसेच अविनाश राऊत (२०, अपेक्षा सोसायटी, आरटीओ कॉर्नर) यालाही अटक करण्यात आली. न्यायालयाने संशयितांना पोलीस कोठडी दिली असून त्यांच्याकडे अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या संशयितांची वज्रेश्वरीनगर, दत्तनगर भागात वरात काढण्यात आली. या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग उघड झाला. त्याला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. ही कामगिरी सहायक निरीक्षक विलास पडोळकर, उपनिरीक्षक संपत जाधव, हवालदार अनिल गुंबाडे, हवालदार सागर कुलकर्णी, दीपक नाईक, महेश नांदुर्डीकर आदींच्या पथकाने पार पाडली.