नाशिक : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोट्यावधी भाविक तसेच पर्यटक कुंभ नगरी मध्ये दाखल होणार आहेत. उत्सव काळात भाविकांची मांदियाळी पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभाग अलर्ट मोडवर आहे. कुंभ पर्वासाठी नाशिक शहरास राज्यातून २२ हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्या पोलीसांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांच्या निवास तसेच भोजन व्यवस्थेवर नाशिक पोलीस दल तसेच प्रशासनाचे काम सुरू आहे. निवास व्यवस्थेसाठी शासकिय इमारती सह गरज पडल्यास नव्याने बांधण्यात आलेल्या निवासी इमारती भाडेतत्तवार घेण्यात येणार आहे.
प्रयागराज कुंभमेळ्यानंतर सर्वांना २०२७ मध्ये नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या काळात प्रत्येक पर्वणीला ८० लाखांहून अधिक भाविक नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल होणार आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरून पर्यटक ही पर्वणी पाहण्यासाठी येणार आहेत. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल प्रयत्न करत आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पर्वणी व भाविकांची होणारी गर्दी पाहता २२ हजार पोलीस बंदोबस्त बाहेरून मागविण्यात येणार आहे. यामध्ये अधिकारी, अंमलदार यांचा समावेश आहे. या शिवाय तीन हजार स्थानिक पोलीसांचा बंदोबस्त राहणार आहे.
पर्वणी काळात हा बंदोबस्त घाट परिसर, गोदा काठ, साधुग्राम, रेल्वेस्थानक, बस स्थानक, गोदाकाठाकडे येणारे प्रमुख रस्ते यासह अन्य ठिकाणी तैनात करण्यात येईल. त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी नाशिक शहर पोलीस जुने बांधकाम, इतर इमारती, मंगल कार्यालय भाडेतत्तावर घेण्यात येणार आहे. यामध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयाची जुने ब’रेक्स, जुने पोलीस क्वार्टस, महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या काही इमारती, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या निवासी इमारती, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या इमारती, पांजरपोळ येथील काही इमारती तसेच महापालिकेच्या निवासी इमारतीसह शहर परिसरातील मंगल कार्यालये बाहेरगावहून येणाऱ्या पोलीसांसाठी निवासव्यवस्थेसाठी आरक्षित करण्यात येणार आहे.
शहर परिसरातील ७० मंगल कार्यालये निश्चित करण्यात आले असून या बाबत मंगल कार्यालय मालक तसेच व्यवस्थापकांसोबत बैठक बोलवण्यात आली आहे. तसेच गरज पडल्यास त्या काळात तयार असलेल्या नव्या निवासी इमारती ज्यांचा ताबा दिला जाणार आहे त्या इमारती भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. दरम्यान, बंदोबस्तासाठी तैनात पोलीस अधिकारी व अंमलदार, होमगार्ड, स्वयंसेवक यांना विशेष तज्ञांकडून आपत्ती व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, चेंगराचेंगरी उद्भवण्यासारखी परिस्थिती झाल्यास काय उपाययोजना कराव्यात या विषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.