नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि प्रमुख मार्गांना जोडणाऱ्या बाह्य वळण रस्त्याचा गांभिर्याने विचार सुरू झाला आहे. कुंभमेळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १३७ किलोमीटर लांबीचा, दोन हजार कोटी रुपये खर्चाचा बाह्य वळण रस्ता प्रस्तावित केला आहे. या रस्त्यामुळे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गांवरील वाहतूक शहरात प्रवेश न करता वळवता येईल, वाहतूक कोंडी टळेल, अशी अपेक्षा आहे.

सिंहस्थ कुंभमेळा तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २५२९ कोटींचा आराखडा सादर करण्यात आला. यात १३७ किलोमीटर लांबीच्या वळण रस्त्याचा अंतर्भाव आहे. शहरातून जाणारा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग, नाशिक-पुणे महामार्ग, नाशिक-छत्रपती संभाजीनगर, गुजरातकडे जाणारा पेठ रस्ता, दिंडोरी अशा प्रमुख रस्त्यांना हा वळण रस्ता विशिष्ट ठिकाणी जोडला जाईल. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करून शहरातून वाहनांची वाहतूक कमी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषण कमी होईल आणि वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल, असे सांगितले जाते.

हेही वाचा…बनावट नोटांप्रकरणी तिघा संशयितांना पोलीस कोठडी

सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते सय्यद पिंप्री, लाखलगाव, चिंचोली, पांढुर्ली, चाकूर, दुगाव, गिरणारे, आंबे दिंडोरी, मानोरी ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन आणि राज्य मार्ग क्रमांक ३७ असे वळण रस्त्याचे नियोजन केले आहे. प्रस्तावित वळण रस्ता काही डांबरी तर, काही सिमेंटचा असू शकेल. वळण रस्त्यासाठी अस्तित्वातील काही मार्गाचे विस्तारीकरण, काही संलग्नीकरण (मिसिंग लिंक) आणि काही ठिकाणी भूसंपादन करावे लागणार आहे. या रस्त्यासाठी सुमारे दोन हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

सिंहस्थ पर्वणी काळात देशभरातून लाखो भाविक शहरात दाखल होतात. या काळात महामार्गावरील वाहतुकीवर काही निर्बंध येतात. पर्यायी मार्गाने ती वळवली जाते. ग्रामीण भागातून प्रमुख राष्ट्रीय व राज्य मार्गांना जोडणाऱ्या वळण रस्त्याने महामार्ग व शहरी भागातील दळणवळणाचा ताण बराचसा कमी होऊन वाहतूक सुरळीत राखली जाईल, असा अंदाज आहे. या संदर्भात बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वळण रस्त्याचा विचार सुरू असल्याचे नमूद केले. अंतिम निर्णय होणे बाकी आहे.

हेही वाचा…माजी महापौर गोळीबारप्रकरणी मालेगावात दोघांना अटक

रस्ते दुरुस्तीसाठी ३८० कोटी

डहाणू-त्र्यंबक-औरंगाबाद रस्ता, नांदगाव-पिंपळगाव-अडसरे टाकेद, वाकी-घोपडगाव- देवळा-टाकेद हर्ष, वाकी-कावनई-रायंदे-कोऱ्हाळे- भावली, साकूर फाटा-पिंपळगाव-भरवीर, भरवीर-अडसरे-सर्वतीर्थ टाकेद, कावनई-गोंदे रस्ता, कावनई-मुकणे रस्ता आदींची दुरुस्ती अथवा काँक्रिटीकरण सुचविण्यात आले आहे.

हेही वाचा…नाशिक, सिन्नर तालुक्यात चारा टंचाईचे संकट

विश्रामगृह, तात्पुरता निवारा, स्वच्छतागृहांचे नियोजन

नाशिक येथे शासकीय विश्रामगृहाजवळ ५० कक्षांचे नवीन विश्रामगृह, त्र्यंबकेश्वर येथे २० कक्षांचे नवीन विश्रामगृह, अस्तित्वातील विश्रामगृहांची दुरुस्ती, मनुष्यबळ पुरवठा आणि इगतपुरी विश्रामगृहाजवळ १० कक्षांचे नवीन विश्रामगृह बांधणी यासाठी ६३ कोटी, मनोरा, लोखंडी जाळ्या, साधुग्रामसाठी तात्पुरती निवासव्यवस्था व स्वच्छतागृह, सात ठिकाणी वाहनतळ, बस थांबा, तात्पुरती निवास व्यवस्था, दवाखाना यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.