नाशिक : मुंबईत बहुप्रतिक्षित उध्दव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांच्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीची घोषणा झाल्यानंतर नाशिक शहरात दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या घोषणेचे जोरदार स्वागत केले आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी उध्दव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे एकत्र येणे हे दोन्ही पक्षांसाठी गरजेचे होते. नाशिक महापालिकेत महायुती होईल की नाही, याची चर्चा सुरु असताना दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा करुन आघाडी घेतल्याचे चिन्ह आहे. विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुंबईत हालचाली सुरु झाल्यावर राज्यात सर्वप्रथम नाशिकमध्ये दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येण्यास सुरुवात झाली होती. उध्दव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांच्यात जागावाटपासंदर्भात नाशिकमध्ये चर्चेच्या काही फेऱ्याही झाल्या आहेत.

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईनंतर नाशिक हे असे शहर आहे की, या शहरात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात मनोमिलनास सुरुवात झाली. दोन्ही पक्षांनी एकत्र येत नाशिकमधील गुन्हेगारी, रस्त्यांची अवस्था, बेरोजगारी, ड्रग प्रकरणातील राजकीय मंडळींचा सहभाग याविरोधात संयुक्त मोर्चा काढला होता. त्यानंतरही दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे एकमेकांच्या पक्ष कार्यालयात जाणे-येणे सुरु झाले होते. या मनोमिलनामुळे महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपात फारसी ओढाताण न होण्याची शक्यता आहे. मनसे, आणि शिवसेना ठाकरे गट नेमक्या किती जागा लढविणार, याविषयी चर्चा सुरु आहे. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे नाशिकमध्ये खऱ्याअर्थाने मनोमिलन झाले आहे.

नाशिक महापालिकेच्या १२२ जागापैकी ७० ते ७५ जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे तर ५० ते ५५ जागा मनसेकडे राहण्याची शक्यता आहे, बलाढ्य अशा भाजपला तोंड देण्यासाठी माकप, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनाही सामा्वून घेण्याची तयारी करण्यात येत आहे. मित्रपक्षांनाही बरोबर घेतल्यास त्यांना किती जागा सोडाव्यात, याविषयी अजूनही चर्चेच्या काही फेऱ्या होण्याची शक्यता आहे. मित्रपक्षांनी अधिक जागांची मागणी केल्यास ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे दोघे युतीच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीला सामोरे जातील.

दुसरीकडे, स्थानिक पातळीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांना मनसे-ठाकरे युतीत सहभागी होण्याची इच्छा असताना राज्यस्तरीय नेत्यांच्या विरोदी भूमिकेमुळे त्यांची पंचाईत झाली आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल दिवे यांनी नुकताच पक्षाचा राजीनामा दिल्याने पक्षाला अजून एक धक्का मिळाला आहे. २०१७ मध्ये झालेल्या नाशिक महापालिकाीत १२२ पैकी पाच जागांवर मनसेचे नगरसेवक निवडून आले होते. तसेच ३५ जागांवर शिवसेना विजयी झाली होती, परंतु, शिवसेनेचे आता दोन तुकडे झाले आहेत. तर मनसेचे दोन नगरसेवक पक्ष सोडून गेल्याने त्यांच्याकडे सध्या केवळ तीन माजी नगरसेवक आहेत.

ठाकरेंच्या शिवसेनेकडे आठ माजी नगरसेवक आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळे सिडको, सातपूर या भागात प्रामुख्याने अधिक लाभ होऊ शकतो. कामगारबहुल हा भाग ठाकरे बंधूंना मानणारा आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास या भागात भाजप तसेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना जोरदार टक्कर देता येईल, असा पदाधिकाऱ्यांचा होरा आहे. युतीची घोषणा झाल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आनंदी वातावरण असल्याचे दिसत आहे. भाजप आणि शिंदे गट आता कोणती पाऊले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.