नाशिक – लहान वयात टेनिस कसे खेळावे, याचा वस्तूपाठ घालून देत मुंबई आणि पुण्याच्या खेळाडूंनी नाशिक गाजविले. त्यास कारण ठरले महाराष्ट्र राज्य टेनिस संघटना आणि नाशिक जिल्हा टेनिस संघटना यांच्या विद्यमाने आयोजित १० वर्ष वयोगटातील मुले व मुली यांच्या “स्मार्ट सुहाना १० ” राज्य मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे.
नाशिक जिल्हा टेनिस संघटनेच्या काॅलेज रोडजवळील डिसुझा कॉलनीतील कोर्टवर “स्मार्ट सुहाना १० ” राज्य मानांकन लॉन टेनिस स्पर्धा झाली. स्पर्धेतील सर्वच सामने चुरशीचे झाले. स्पर्धेचे उदघाटन नाशिक जिल्हा टेनिस संघटनेचे माजी अध्यक्ष सत्यजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. पारितोषिक वितरण राज्य टेनिस संघटनेचे उपकार्याध्यक्ष राजीव देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त करतांना खेळाडूना टेनिसचा आनंद घेण्याचे आणि पालकांनी आपल्या मुलांवर जिंकण्याचा दबाव न टाकण्याचे आवाहन केले. हे वय कमी असल्याने मुलांचे अजून खूप टेनिस खेळणे बाकी आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा तणाव बाळगू नये, असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळेस व्यासपीठावर जिल्हा टेनिस संघटनेचे अध्यक्ष अद्वैत आगाशे ,उपाध्यक्ष समीर कपूर, सचिव डॉ. संजय पिंचा, कार्यकारिणी सदस्य एकनाथ किणीकर, दिलीप लोंढे, विभागीय टेनिस समन्वयक राकेश पाटील, स्पर्धा प्रमुख पंच अपूर्वा रोकडे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संघटनेचे अध्यक्ष अद्वैत आगाशे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय पिंचा यांनी केले नविन खेळाडूंना स्पर्धात्मक खेळाकडे आकर्षित करण्याकरिता सदर स्पंधेचे आयोजन राज्यातील विविध ठिकाणी केले जाते.
या स्पर्धेत मुलींच्या गटात मुंबईच्या ग्यान्वी शिवमठ, अनन्या जाधव आणि मुलांच्या गटात पुण्याच्या रियान पाटील आणि श्लोक हिंगे यांनी बाजी मारली. स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्यापूर्वी पुण्याच्या रियान पाटीलने उपांत्य फेरीत पुण्याच्याच सर्वेश मोहितेचा ६-२असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पुण्याच्या श्लोक हिंगे याने पुण्याच्याच आहान नारगोलकर याचा अतिशय अटीतटीच्या लढतीत ६- ५ असा पराभव केला. तर अंतिम फेरीत रियानने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर श्लोक हिंगे याच्यावर ४-१, ४-२ अशी सरळ मात करुन विजेतेपद मिळविले.
मुलींच्या गटात उपांत्य फेरीत मुंबईच्या ग्यान्वी शिवमठने आपल्या संयमी खेळाचे प्रदर्शन केले. जास्तीतजास्त रॅली करुन सोलापूरच्या ज्योतिष्का अरेकांती हिचा ६ -४ असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत मुंबईच्या अनन्या जाधवने धुळ्याच्या निधी पाटीलवर ६-२ अशी एकतर्फी मात केली. अंतिम फेरीत ग्यान्वीने प्रतिस्पर्धी अनन्याला पराभूत करताना आक्रमक पध्दतीने फोरहँडचा वापर केला. ४-१, ४-२ असा सरळ सेटने पराभव केला. आणि स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
विजेत्या खेळाडूंना प्रशस्तीपत्र आणि चषक देण्यात आले. तसेच विजेत्या खेळाडूंना राज्य मानांकनाचे महत्त्वाचे गुण बहाल करण्यात आले. उर्वरित खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी धवल पटेल, तुषार अंधृतटकर, खेळाडू, पालकवर्ग उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुधीर शिंदे, गोरख खैरनार, गौरी आगळे, अविनाश देवकाते, किशोर खरात आदींनी परिश्रम घेतले.

