नाशिक : मद्य तस्करीतील वादातून झालेल्या मृत्यूच्या गुन्ह्यातील आणखी एका संशयितास स्थानिक गुन्हे शाखेकडून नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथून अटक करण्यात आली. चांदवड - मनमाड रस्त्यावर अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्या मोटारीने राज्य उत्पादन शल्क विभागाच्या वाहनाला दिलेल्या धडकेत राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेत लासलगाव पोलीस ठाण्याचे दोन अंमलदारही गंभीर जखमी झाले होते. चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी संशयितांच्या अटकेसाठी पथके रवाना केली होती. देवीश पटेल, अशपाक शेख, राहुल सहाणी, शोहेब अन्सारी या संशयितांना अटक करण्यात आली. उर्वरित संशयितांच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नंदुरबार जिल्ह्यात रवाना झाले होते. हेही वाचा: Nashik Rain News: घाटमाथ्यावर मुसळधार, चार धरणांमधून विसर्ग; गंगापूरमध्ये ५३ टक्के जलसाठा तळोदा परिसरात सतत पाळत ठेवून मिळवलेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्याच्या दिवशी मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या ताफ्यात सामील असलेला व परराज्यातून महाराष्ट्रात मद्याची तस्करी करणारा भावेशकुमार प्रजापती (४२, रा. सुरत) याला तळोदा येथून ताब्यात घेण्यात आले. भावेशकुमार हा घटनेच्या दिवशी मुख्य मोटारीबरोबर त्याच्याकडील वाहनातून मद्यसाठ्याची वाहतूक करत होता. त्याला वाहन थांबविण्याचा इशारा केला असता तो पोलिसांना हुलकावणी देवून फरार झाला होता.