नाशिक : शहरातील गुन्हेगारांना पोलिसांचा कोणताही धाक उरला नसल्याचे पुन्हा सिध्द झाले असून राका काॅलनीतील नवकार रेसिडेन्सीत माजी नगरसेविका ममता पाटील यांच्या निवासस्थानी सोमवारी मध्यरात्री झालेल्या घरफोडीत एक कोटीहून अधिकचे दागिने आणि रोख रकमेची लूट करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी उशीरा सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

नवकार रेसिडेन्सीतील सदनिकेत डॉ. शैलेंद्र पाटील आणि माजी नगरसेविका ममता पाटील कुटूंबियासह राहतात. काही कामानिमित्त ते धुळे येथे गेले होते. घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करुन एक कोटीहून अधिकचे मौल्यवान दागिने, रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे, या इमारतीतील इतर सदनिकांमध्ये रहिवासी असतानाही याविषयी कोणालाही माहीत झाले नाही. मंगळवारी सकाळी सफाई कर्मचारी साफसफाईसाठी आल्यावर घरफोडी झाल्याचे लक्षात आले. समोरील इमारतीमधील सीसीटीव्ही चित्रणात तीन जण चोरी करत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रातील कांद्याला बांग्लादेशची सीमा ३२ तासानंतर खुली, निर्यातदारांना बँकांचे व्यवहार सुरळीत होण्याची प्रतिक्षा

घरफोडीविषयी नातेवाईकांनी डॉ. पाटील यांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस उपायुक्त, स्थानिक गुन्हे शाखा तसेच गुन्हे शाखा विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी भेट देत पाहणी केली.