नाशिक : कमी पावसामुळे दुष्काळसदृश्य स्थितीला तोंड देणाऱ्या जिल्ह्यातील अनेक भागात हिवाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. धरणात उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन, धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याचे दिलेले आदेश हे विषय प्रलंबित असताना पुढील काळात स्थानिक पातळीवर गडद होणाऱ्या दुष्काळाची चाहूल टंचाईच्या स्थितीतून येत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १३१ गावे आणि २३७ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

काही वर्षांपासून पावसाचे विलंबाने आगमन होत असल्यामुळे धरणात उपलब्ध जलसाठ्यातून जुलैऐवजी ऑगस्ट २०२४ पर्यंत पिण्याच्या पाण्याचे फेरनियोजन करण्याची तयारी प्रगतीपथावर आहे. दुसरीकडे दुष्काळी परिस्थितीत जायकवाडीसाठी नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यास सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. माणसांसह जनावरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टँकरची गरज भासणार आहे. लोकसंख्येनुसार पाण्याची आवश्यकता, जनावरांसाठी लागणारे पाणी, औद्योगिक वसाहतींना लागणारे पाणी आदींचा विचार फेरनियोजनात केला जाणार आहे. अलीकडेच शासनाने मालेगाव, येवला, सिन्नर या तालुक्यांसह अन्य आठ तालुक्यातील ४६ महसुली मंडळात दुष्काळ जाहीर केला. अनेक भागात हिवाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने पुढील काळात काय स्थिती होईल, याची चिंता आहे. सध्या जिल्ह्यातील ३६८ गाव-वाड्यांना टंचाईच्या झळा बसत असल्याचे प्रशासनाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा : नियमांचे पालन न करणाऱ्या तीन खासगी बस जप्त; जळगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई

यंदा बहुतांश भागात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. परिणामी, अनेक भागात पिण्याच्या पाण्याची गरजही पूर्ण होणार नाही अशी स्थिती आहे. हिवाळ्यात सात तालुक्यात टँकरने पिण्याचे पाणी उपलब्ध करावे लागत आहे. सध्या १३१ गावे आणि २३७ वाड्यांना १०४ टँकरद्वारे पाणी दिले जाते. टँकरच्या दिवसभरात २४० फेऱ्या होतात. नांदगाव तालुक्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. या एकाच तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १९९ गाव आणि वाड्यांना ३५ टँकरने पाणी दिले जात आहे. येवला तालुक्यात ६० गाव, वाड्यांना (२३ टँकर) मालेगाव २७ (१५ टँकर), चांदवड २८ गाव-वाड्या (१० टँकर), सिन्नर नऊ गाव-वाडे (नऊ टँकर), देवळा २३ गाव-वाडे (सहा टँकर) आणि बागलाण तालुक्यात २२ गाव-वाड्यांना सहा टँकरने पाणी पुरविले जात आहे.

हेही वाचा : तोरणमाळमध्ये वैविध्यपूर्ण पर्यटनाच्या संधी, आदिवासी महोत्सवात डाॅ. विजयकुमार गावित यांचे प्रतिपादन

हिवाळ्यात टँकरची संख्या शंभरीपार गेली आहे. दुष्काळाची तीव्रता पाहता पुढील काळात टँकरची मागणी वाढण्याची चिन्हे आहेत. एरवी, उन्हाळ्यात काही गावांमध्ये टंचाईचे संकट भेडसावत असे. या वर्षी पावसाळा आणि हिवाळ्यात टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

४१ विहिरी अधिग्रहीत

पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाने ४१ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. यातील २१ गावांसाठी तर उर्वरित विहिरी टँकर भरण्यासाठी असल्याचे अहवालात म्हटले आहे. मालेगाव तालुक्यात १८, नांदगावमध्ये १४, देवळा तीन, येवला व चांदवडमध्ये प्रत्येकी एक, बागलाणमध्ये चार विहिरींचा समावेश आहे. मालेगाव व नांदगाव तालुक्यात सर्वाधिक विहिरींचे अधिग्रहण झाले आहे.

Story img Loader