वीज देयकाची दीड लाखाची थकबाकी; मीटर तुटवडय़ामुळे रुग्णालय कार्यान्वित होण्यात अडचणी

नाशिक : स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मनपाच्या मुलतानपुरा येथील ज्या प्रसुतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले, ते खंडित वीज पुरवठय़ामुळे अद्याप कार्यान्वित झाले नसल्याची बाब स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली. रुग्णालय इमारतीचे दीड लाखाचे वीज देयक थकीत आहे. नव्याने जोडणीसाठी वाढीव सुरक्षा अनामतपोटी जवळपास सव्वा दोन लाख भरायचे आहे. ‘थ्री फेज’ मीटर उपलब्ध नसल्याने रुग्णालयाच्या वीज जोडणीस १० ते १५ दिवस लागणार आहे. या स्थितीत अंधारात असणाऱ्या प्रसुतिगृहाच्या उद्घाटनाचा अट्टाहास केला गेल्याचे उघड झाले आहे.

बुधवारी स्थायी समितीची ऑनलाईन बैठक सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिना मेमन यांनी मुलतानपुरा रुग्णालय कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला. जुने नाशिक भागातील गरीब महिलांना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाचा आधार होता. तथापि, गेल्या वर्षी ते करोना रुग्णालय केले गेले. त्याचवेळी मुलतानपुरा भागात महिलांसाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते. सातत्याने पाठपुरावा करूनही आरोग्य-वैद्यकीय विभागाने दिरंगाई केली. १५ ऑगस्ट रोजी मनपाने या रुग्णालयाचे उद्घाटन केले. मात्र, ते अद्याप सुरू झाले नाही. परिणामी, स्थानिक महिलांना अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची तक्रार त्यांनी केली.

यावर आरोग्य-वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिलेल्या निवेदनातून मुलतानपूरा येथील प्रसुतिगृहाच्या सद्यस्थितीवर प्रकाश पडला. रुग्णालय इमारतीच्या थकीत वीज देयकापोटी एक लाख ४८ हजाराचा धनादेश वीज कंपनीला दिला जात आहे. पण दोन वर्षांपासून पुरवठा खंडित राहिल्याने वाढीव सुरक्षा अनामत भरावी लागणार आहे. वीज कंपनीकडे सध्या ‘थ्री फेज’ मीटर उपलब्ध नसल्याने जोडणी झाली नाही. ती झाल्यानंतर रुग्णालय लगेचच कार्यान्वित केले जाईल, असे त्यांनी नमूद केले. यावर मेमन यांच्यासह सदस्यांनी आक्षेप घेतला. प्रसुतिगृहासाठी आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे आणि तत्सम सुविधा उपलब्ध केल्या गेल्या नाहीत. उद्घाटनाचे श्रेय कुणीही घ्यावे, पण ते तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागणी करण्यात आली. वैद्यकीय विभागाच्या कार्यपध्दतीवर योगेश हिरे यांनी ताशेरे ओढले. मल्हारगेट येथील मनपाचा दवाखाना कित्येक वर्षांपासून बंद आहे. प्रभाग सातमधील झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांना प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. तो दवाखाना सुरू करण्याची मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. स्वातंत्र्यदिनी वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांना सुट्टी न देता कामावर बोलाविले. त्यास सलीम शेख यांनी आक्षेप घेतला. डॉ. आवेश पलोड यांनी अत्यावश्यक सेवेतील हे कर्मचारी असल्याचे नमूद केले. तर, कामावर असतानाही सुट्टीचे कारण देत संबंधितांनी चिकु नगुनियाचे रुग्ण सापडलेल्या भागात फवारणीस टाळाटाळ करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली. करोना काळात अनेक कुटुंबातील कर्त्यां पुरूषांचे निधन झाले. महिला आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिंप्री चिंचवड महापालिकेप्रमाणे नाशिक महापालिकेने अशा कुटुंबांना आर्थिक मदत देण्याची मागणी हिमगौरी आहेर-आडके यांनी केली.

मुलतानपुरा येथील रुग्णालय आणि मल्हार गेटस्थित दवाखाना पुढील स्थायी समितीच्या बैठकीपर्यंत कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णालयात एक्स रे यंत्रणा आणि अन्य सुविधांची उपलब्धता करावी. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले गेले. अशी चूक पुन्हा करू नये, असे वैद्यकीय विभागास सांगण्यात आले आहे.

– गणेश गिते (स्थायी सभापती, महानगरपालिका)