गर्दी जमविल्याने सहा नगरसेवकांविरुध्द गुन्हा

नाशिक : महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना शहरात विकास कामांचे उद्घाटन आणि  लोकार्पणाचा धडाका सुरू झाला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू मनाई आदेशही नगरसेवक धुडकावत आहेत. अशाच दोन विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण कार्यक्रमात गर्दी जमविल्याप्रकरणी सहा नगरसेवकांविरुध्द पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यात तीन नगरसेविकांचाही समावेश आहे.

करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने बरेचसे निर्बंध शिथील झाले आहेत. परंतु, सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमविण्यास मनाई आहे. महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या नगरसेवकांना शासन आणि पोलिसांनी लागू केलेल्या नियमावलीचा विसर पडू लागल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक २८ मध्ये जलकुंभाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती. करोनाचा संसर्ग होईल याची जाणीव असताना १०० ते १५० शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी जमविली गेली. करोनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून लोकार्पण सोहळा पार पडला. पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी नगरसेवक दीपक दातीर, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, नगरसेविका सुवर्णा मटाले, नगरसेविका प्रतिभा पाटील यांच्याविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरा प्रकार प्रभाग क्रमांक २६ मध्ये घडला. शिवसेना नगरसेवक भागवत आरोटे, नगरसेवक मधुकर जाधव यांनी अंबड येथे रस्ता काँक्रिटीकरणाचे उद्घाटन जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते  केले. या कार्यक्रमासही परवानगी घेतलेली नव्हती. करोना काळात २० ते २५ सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी जमविली गेली. या प्रकरणी आरोटे व जाधव या नगरसेवकांविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांची डोकेदुखी वाढणार

महापालिका निवडणुकीस अवघ्या पाच महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. आचारसंहिता लागू होण्याआधी विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पणाचा बार उडत असतो. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, विद्यमान नगरसेवक अशाच कार्यक्रमातून प्रचाराचा नारळ फोडतात. निवडणुकीच्या तोंडावर असे कार्यक्रम वाढण्याची चिन्हे आहेत. यामुळे पोलीस यंत्रणेची डोकेदुखी वाढणार आहे. निर्बंध शिथील होत असले तरी करोनाच्या नियमावलीचे पालन करणे  प्रत्येकास आजही बंधनकारक आहे. बहुतांश राजकीय कार्यक्रमात नेत्यांसह कार्यकर्ते  ही नियमावली खुंटीवर टांगतात. हे प्रकार पुढील काळात वाढतच जाणार आहेत.