रेल्वे स्थानकातील अडथळय़ांमुळे प्रवाशांची गैरसोय

करोना काळात गर्दीवरील नियंत्रणासाठी आणि प्रादुर्भावाचे संकट असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून येथील नाशिकरोड रेल्वे स्थानकात तसेच बाहेर उभारण्यात आलेले अडथळे आता प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहेत.

खासदारांकडून दखल

नाशिक : करोना काळात गर्दीवरील नियंत्रणासाठी आणि प्रादुर्भावाचे संकट असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून येथील नाशिकरोड रेल्वे स्थानकात तसेच बाहेर उभारण्यात आलेले अडथळे आता प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहेत. हे अडथळे काढण्यासंदर्भात करण्यात येत असलेल्या मागणीची खासदार हेमंत गोडसे यांनी दखल घेत अनावश्यक अडथळे हटविण्याची सूचना रेल्वे स्थानक अधिकाऱ्यांना केली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपूर्वी मोठय़ा प्रमाणावर वाढल्याने सर्वत्र खबरदारीचे उपाय करण्यात आले होते. त्याअंतर्गत रेल्वे स्थानक परिसरातही काही उपाययोजना करण्यात आल्या. प्रवाशांनी एकमेकांमध्ये अंतर राखून स्थानकात प्रवेश करावा, यासाठी स्थानकात तसेच स्थानकाबाहेरील आवारात लोखंडी अडथळे उभारण्यात आले. करोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला असल्याने रेल्वे स्थानकातील नेहमीचे व्यवहार सुरळीत झाले आहेत. रेल्वे गाडय़ाही सुरु झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे येणे-जाणे वाढले आहे. परंतु, करोना काळातील अडथळे कायम असल्याने प्रवाशांना वेगवेगळय़ा ठिकाणी अडथळे पार करुन फलाट गाठावे लागत आहे.

प्रामुख्याने फलाट क्रमांक दोन आणि तीनवर जाण्यासाठी प्रवाशांना अडथळे ओलांडण्याची कसरत अधिक प्रमाणावर करावी लागते. विशेषत: ज्येष्ठ प्रवासी, लहान मुले यांना सोबत घेऊन प्रवास करणाऱ्यांना हे अडथळे म्हणजे नकोसे झाले आहेत.

यासंदर्भात प्रवाशांच्या तक्रारी थेट खासदार गोडसे यांच्यापर्यंत गेल्यावर त्यांनी स्थानक परिसरात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रवाशांच्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे त्यांना यावेळी दिसून आले. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेवक रमेश धोंगडे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश फोकणे आणि काही रिक्षाचालकही होते. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत स्थानक प्रबंधक आर. के. कुठार यांची गोडसे यांनी भेट घेतली. अडथळय़ांमुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची जाणीव करुन देत ज्यांची गरज नाही, असे अडथळे हटविण्याची सूचना गोडसे यांनी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Inconvenience passengers obstruction railway station ysh

ताज्या बातम्या