नाशिक :  करोनासंकट काही प्रमाणात कमी झाले असले तरी पावसाळा असल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात सध्या मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वातावरणातील बदलामुळे वाढ झाली आहे. आरोग्य विभागाकडून निश्चित आकडेवारी जाहीर केली जात नसल्याने संभ्रम वाढला आहे तर  दुसरीकडे, आरोग्य विभागाने शंका निर्थक असल्याचा दावा केला आहे.

वातावरणातील बदलांमुळे साथीच्या आजाराचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यातचे डेंग्यूचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत आहेत. जुलैमध्ये दोन अंकी असणारी संख्या नऊशेपेक्षा अधिक झाली आहे. खासगी रुग्णालयात सरकारी आकडेवारीपेक्षा संख्या जास्तच असल्याचे सांगितले जाते. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील आकडेवारीच्या तफावतीमुळे प्रश्न उपस्थित होत आहे.

खासगी रक्तपेढ्यांनी दररोज डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांचा दैनंदिन अहवाल महानगरपालिकेला कळविणे आवश्यक असतांना तसे होत नाही. डेंग्यूचे रुग्ण आढळल्यास काही खासगी रुग्णालयांमधील जागरूक

डॉक्टरांकडून महानगरपालिकेला कळविले जाते. परंतु, काही रुग्णालयांकडून तशी कोणतीही माहिती कळविली जात नाही. त्यामुळे आरोग्य खात्याकडे जमा होणाऱ्या माहितीमध्ये तफावत आढळत आहे.

मागील वर्षांच्या तुलनेत रुग्णांची संख्या वाढली आहे. मागील वर्षी करोना कहर असल्याने त्या काळात चाचण्या पुरेशा प्रमाणात झाल्या नसतील किंवा थंडी, ताप ही लक्षणे असल्याने करोनाचा उपचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यंदा हे प्रमाण वाढले आहे. नाशिक जिल्ह्यात ग्रामीणमध्ये १४५ तसेच नाशिक आणि मालेगाव महापालिका परिक्षेत्रात ७२७ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. खासगी रुग्णालयांकडून आकडेवारी दिली जात असल्याचा दावा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वैशाली पाटील यांनी केला. 

दुसरीकडे, मालेगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी आम्ही अगोदरच सर्व खासगी रक्तपेढय़ांना आणि खासगी डॉक्टरांना याबाबत सूचना दिल्या आहेत. पण ते दैनंदिन अहवाल देत नसल्याचे सांगितले. अहवाल वेळेत कळविण्याविषयी सक्ती केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.